- जमीर काझीमुंबई : कारमायकल रोड स्फोटक कार व ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्यावर ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांची सुरुवातीपासून विशेष मर्जी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे दीर्घ निलंबनानंतर दोघे पुन्हा सेवेत रुजू झाल्यावर २४ तास उलटण्यापूर्वीच त्यांना ‘क्रीम पोस्टिंग’ मिळाली होती. सिंग यांनीच त्याबाबतचे आदेश दिले होते, ही बाब कागदपत्रांतून समोर आली आहे.
एनआयएने वादग्रस्त माजी पोलीस एन्काउंटर स्पेशालिस्ट शर्माला अटक केल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. लखन भय्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्माला २००८ मध्ये निलंबित करण्यात आले होते. खालच्या कोर्टाने त्याला दोषमुक्त करण्याच्या दिलेल्या निर्णयाला सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र तत्कालीन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी २३ ऑगस्ट २०१७ रोजी त्याचे निलंबन रद्द करून त्याला पुन्हा सेवेत घेतले, त्याच दिवशी त्याचे ठाणे आयुक्तालयात बदलीचे आदेश काढले. तर तत्कालीन ठाणे आयुक्त परमबीर सिंग यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ ऑगस्टला प्रदीप शर्माची गुन्हे शाखेत खंडणी विरोधी पथकात नियुक्तीचे आदेश काढले.याप्रकरणी आता सर्व कागदपत्रे हाती घेण्यात आली असून त्याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सचिन वाझेच्या नियुक्तीमध्येही सिंग यांनी अशीच गती दाखवली होती. ख्वाजा युनूस प्रकरणात उच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढलेल्या वाझेला गेल्या वर्षी ५ जूनला त्यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई पोलीस आढावा समितीने सेवेत घेतले. त्यानंतर ८ जूनला सशस्त्र दल विभागात त्याची नियुक्ती केली. तर ९ जूनला सिंग यांनी त्याची गुन्हे अन्वेषण शाखेत बदली करण्यात आली हाेती. त्यानंतर तत्कालीन सहआयुक्तांचा विरोध असताना त्यांना गुन्हे गुप्त वार्ता विभागाचे प्रभारी करण्याचे तोंडी आदेश दिले होते. दोघांकडे सर्व महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोपविण्यात आल्याचे समजते.