नवीन पनवेल : बांधकाम व्यावसायिक दिलेले पैसे परत देत नसल्याने एकाने शिवसेना भवन, दादर येथे अर्ज दिला होता. यावेळी अनोळखी इसमाने शिवसेना भवनमधून प्रमोद महाजन बोलतोय, तुम्ही दहा हजार रुपये पाठवा असे सांगून दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उरण पोलीस ठाण्यात प्रमोद महाजन आणि पवन शरद पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उरण, बोरी नाका येथे राहणारे पंकज धारगळकर यांनी दिवा-ठाणे येथे महेश पटेल या बिल्डरच्या साई कनिष्क बिल्डर संस्थेकडून फ्लोरिडा बिल्डिंग येथे २०१७ मध्ये सातव्या माळ्यावर फ्लॅट विकत घेतला होता. त्या इमारतीचे बांधकाम बिल्डरने पूर्ण केलेले नाही. या बिल्डरला त्यांनी ३५ लाख रुपये दिले होते. विकत घेतलेल्या फ्लॅटचे आणि इमारतीचे काम बिल्डर पूर्ण करीत नसल्याने आणि दिलेले पैसे परत करीत नसल्याने पंकज यांनी शिवसेना भवन, दादर, मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या नावाने मार्च २०१९ रोजी अर्ज दिला. ७ एप्रिल रोजी पंकज घरी असताना त्यांना अनोळखी इसमाचा फोन आला. यावेळी तुमचे अडकलेले पैसे साई कनिष्क बिल्डरकडून परत मिळवून देतो, त्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपये प्रोसेसिंग फी द्यावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर प्रमोद महाजन यांनी पंकज यांच्या व्हाॅट्सॲप अकाउंटला त्याचा सहकारी पवन शरद पाटील याच्या नावाने फोन पे अकाउंटचा क्यूआर कोड पाठविला. ७ एप्रिल रोजी प्रमोद महाजन याला पंकजने व्हाॅट्सॲप कॉल केला असता त्यांचा माणूस २०-२० लाखांचे दोन डीडी घेऊन निघाला असून, सायंकाळपर्यंत तुमच्याकडे पोहोचेल असे सांगितले. मात्र, कोणीही त्यांच्या घरी आले नाही. यावेळी पंकज यांनी शिवसेना नेते नांदगावकर यांना फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला असता त्यांनी शिवसेना भवन हे कोरोनामुळे बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे कोणीतरी खोटी माहिती देऊन १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
शिवसेना भवनमधून प्रमोद महाजन बोलतोय...; १० हजारांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 5:27 AM