उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक विचित्र प्रेम प्रकरण समोर आले आहे. येथे, सोबतच जगण्या-मरण्याची शपथ घेतलेले एक प्रेमी जोडपे नैनी पुलावर पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर, प्रेयसीने तर नदीत उडी घेतली, पण प्रियकराने उडी मारलीच नाही. हे पाहून प्रेयसी नदीतून पोहत बाहेर आली आणि तिने प्रियकरा विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
महत्वाचे म्हणजे, संबंधित महिलेला पोहता येत होते. म्हणून ती पोहून बाहेर तरी येऊ शकली. पण ती बाहेर येईपर्यंत, प्रियकराने घटना स्थळावरून पळ काढला होता. यामुळेच संतापलेल्या तरुणीने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रियकराच्या लग्नामुळे नाराज होती विवाहित प्रेयसी -खरे तर 32 वर्षीय विवाहित महिला 30 वर्षीय युवकाच्या प्रेमात पडली होती. या दोघांचे प्रेम प्रकरण एवढे वाढले, की त्यांनी एकमेकांसोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली. दरम्यान, संबंधित महिला आपल्या मुलांना घेऊन पुण्याला फिरण्यासाठी गेली. याच काळात प्रियकराचे लग्न झाले. प्रेयसी जेव्हा पुण्याहून परतली, तेव्हा तिला प्रियकराच्या लग्नासंदर्भात माहिती मिळाली. यानंतर, संतापलेल्या प्रेयसीने प्रियकराला पत्नीस घटस्फोट देण्यास सांगितले आणि आपल्यासोबत लग्न करावे यासाठी भांडण सुरू केले. पण प्रियकराला हे अमान्य होते.
या भांडणात दोघांनीही सोबतच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही प्रयागराजच्या नव्या पुलावरून उडी मारायचेही ठरवले. ते आत्महत्या करण्याच्या उद्देशाने पुलावरही पोहोचले. यानंतर, प्रेयसीने नदीत उडी घेतली, पण प्रियकराने उडी मारलीच नाही आणि तो घटनास्थळावरून पसार झाला. यानंतर, संबंधित विवाहित प्रेयसीने प्रयागराजच्या किडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून हत्येचा प्रयत्न, मोबाईल फोनचे नुकसान करणे, या बाबत गुन्हा दाखल केला आहे.