मुंबई : सिद्धीविनायकाच्या ऑनलाइन पूजेसह घरपोच प्रसाद देण्याच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या चारपैकी एका आरोपीला कोलकात्याहून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सुपोर्नो प्रदीप सरकार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी तपास सुरू असून, इतर तीन आरोपींनाही अटक करण्यात येणार आहे.
सिद्धीविनायक मंदिर न्यास येथे पर्यवेक्षक म्हणून काम करत असलेले जनार्दन आनंद शिरवाडकर यांच्या न्यासाच्या इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी या प्रकरणी दादर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, ‘उत्सव पूजा ॲप’ या गुगल प्ले स्टोअर ॲपवरून भाविकांकडून ऑनलाइन सिद्धीविनायक पूजा, घरपोच प्रसादाच्या नावाखाली ७०१ रुपयांपासून २१ हजार १ रुपये घेऊन फसवणूक केली जात होती. त्यामुळे मंदिराने तक्रार दिल्याने बोगस अशा उत्सव ॲपच्या अज्ञात व्यक्तींवर दादर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कसा केला तपास? ॲपवर पैसे भरलेल्या महिलेच्या गुगल पे या ट्रान्झॅक्शनची माहिती घेतली. महिलेला पैसे भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आलेल्या मोबाइल नंबरचे विश्लेषण केले. बोगस उत्सव ॲपच्या जी-मेलचे गुगलवरून प्राप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण केले. कोलकाता (पश्चिम बंगाल)मधील चार आरोपी असल्याचे समोर आले.
भाविकांनी काय करावे ? ऑनलाइन पूजा तसेच इतर सेवांसाठी देवस्थानच्या अधिकृत वेबसाइट, ॲपचा वापर करावा. अधिकृत वेबसाइट ही सर्च इंजिनद्वारे सर्च करताना त्या वेबसाइटला एचटीटीपीएस : / आहे का ते पाहावे. म्हणजेच ती वेबसाइट सुरक्षित आहे का? ते समजते. वेबसाइट ओपन केल्यानंतर ब्लॉकच्या यूआरएल या सुरुवातीला लॉक असेल तर ती वेबसाइट जास्त सुरक्षित असेल, असे समजावे. ॲप डाऊनलोड करून त्याचे रेटिंग पाहावे. ॲप वापरकर्त्यांकडून कोणकोणत्या परवानगी मागत आहे, हे तपासावे.
पश्चिम बंगाल राज्यातील बिरभूम जिल्ह्यात बोलपूर येथे राहणारा सुपोर्नो प्रदीप सरकार ॲप डाऊनलोड केल्यानंतर ऑनलाइन पूजा व घरपोच प्रसादासाठी रजिस्ट्रेशन करून पैसे भरण्यास सांगत असे. म्हणून तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.