अॅडलेड: जगभरात कोरोनानं थैमान घातलं असताना एका बाजूला माणुसकीच्या नात्यानं अनेक जण मदतीचा हात पुढे करत असताना दुसऱ्या बाजूला माणुसकीला काळीमा फासल्या जात असल्याच्या घटना घडत आहेत. पोलीस असल्याची बतावणी करत हॉटेलमधल्या आयसोलेशन विभागात शिरलेल्या एकानं दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना ऑस्ट्रेलियातल्या अॅडलेडमध्ये घडली आहे. शुक्रवारी रात्री घडलेला हा प्रकार आज उघडकीस आला.शुक्रवारी रात्री एक ३१ वर्षीय व्यक्ती रात्री अॅडलेडमधल्या एका हॉटेलमध्ये शिरली. या व्यक्तीनं दोन महिलांवर बलात्कार केला. या प्रकरणातील पीडित महिलेनं सोमवारी शुक्रवारी घडलेला संपूर्ण प्रकार न्यायालयाला सांगितला. 'शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास आरोपी हॉटेल रुममध्ये आला. त्यानं पोलीस अधिकारी असल्याचं सांगत ओळखपत्र दाखवलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध सुविधांची माहिती घेण्यासाठी आल्याचं त्यानं सांगितलं. त्यामुळेच आपण त्या व्यक्तीला खोलीत येऊ दिलं,' अशी माहिती पीडितेनं दिली. खोलीत प्रवेश दिल्यानंतर आरोपीनं बंदुकीचा धाक दाखवून माझ्या हातात बेड्या घेतल्या. त्यानं माझ्याकडे पैशांची मागणी केली. मी त्याला चारशे डॉलर्स दिले. त्यानंतर त्यानं पुन्हा मला बंदुकीचा धाक दाखवला. त्यामुळे मी माझ्याकडचे ६ हजार २०० डॉलर्स त्याला दिले. माझ्याकडे खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठीही पैसे नसल्याचं मी त्याला गयावया करून सांगितलं. त्यानंतर त्यानं मला ४०० डॉलर्स परत दिले, अशी आपबिती पीडितेनं न्यायालयाला सांगितली.यानंतर आरोपीनं महिलेला बेडरुममध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं पीडितेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. त्याच रात्री पावणे अकराच्या सुमारास आरोपी हॉटेलमधील दुसऱ्या महिलेच्या खोलीत गेला. तिलाही त्यानं बंदुकीचा धाक दाखवून धमकावलं. शरीरसंबंधास नकार दिल्यास तुरुंगात टाकेन, अशी धमकी आरोपीनं दिल्याचं वकिलांनी न्यायमूर्तींना सांगितलं. आरोपीच्या वकिलांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी आरोपीला जामीन देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयानं ती अमान्य करत आरोपीची रवानगी तुरुंगात केली.
CoronaVirus: पोलीस असल्याचं सांगत आयसोलेशनमधील दोन महिलांवर बलात्कार; ऑस्ट्रेलियात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 9:07 PM