प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरण : आरोपीला सुनावलेल्या फाशीची शिक्षा रद्द; आता जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 08:52 PM2019-06-12T20:52:24+5:302019-06-12T20:54:28+5:30
अंकुरच्या फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुंबई - विवाहाची मागणी मंजूर न केल्याने एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला करून प्रीती राठी (२३) हिचा जीव घेणाऱ्या आरोपी अंकुर पनवार (२५) याची फाशीची शिक्षा मुंबई हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. अंकुरच्या फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
अंकुरने न्यायालयाच्या फाशीच्या निर्णयाविरोधात आव्हान याचिका दाखल केली होती. प्रीतीला ठार मारण्याचा उद्देश नव्हता केवळ जखमी करण्याचा उद्देश होता, असा युक्तीवाद करत अंकुरच्या वकिलांनी फाशीची शिक्षा रद्द करण्याची विनंती न्यायालयासमोर केली. याशिवाय, पोलिसांच्या तपासावर देखील अंकुरच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. प्रीती राठीवर अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने अंकुर पनवार याला फाशीची शिक्षा सुनावली होती. अॅसिड हल्लाप्रकरणी सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले देशातील हे पहिलेच प्रकरण होते.
दिल्लीहून नौदलाच्या हॉस्पिटलमधील नोकरीवर रुजू होण्यासाठी प्रीती २ मे २०१३ साली मुंबईत वडिल आणि नातेवाईकांसह दाखल झाली होती. मात्र, वांद्रे टर्मिनस स्थानकावर अंकुर पनवारने तिच्यावर अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रीतीच्या एका डोळ्याला दुखापत झाली होती. त्याशिवाय या हल्ल्यात वडील, मावशी, काका आणि अन्य दोन प्रवासीही जखमी झाले होते. अॅसिड हल्ल्यात प्रीतीच्या यकृताला गंभीर दुखापत झाली. हल्ल्यानंतर प्रीतीने महिनाभर मृत्यूशी झुंज दिली. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.