टोकियो - अभिनेत्री प्रीती झिंटाचा एक्स बॉयफ्रेंड नेस वाडिया याला जपानमध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. वाडिया ग्रुप हा देशातील सर्वात जुन्या बिसिनेस ग्रुपपैकी एक आहे. या ग्रुपच्या संचालक कुटुंबातील नेस वाडिया हा महत्वाचा सदस्य आहे. फिनान्शिअल टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार मार्च महिन्यामध्ये न्यू चिटोज विमानतळावर नेस वाडियाकडे २५ ग्राम गांजा सापडला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. इंडियन प्रीमिअर लीगमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा तो सह मालक आहे.
जपानमध्ये पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांसाठी अमली पदार्थविरोधी मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. यामुळे नेस वाडियाला अटक करून त्याला तत्काळ शिक्षा सुनावण्यात आली. या बातमीमुळे वाडिया समूहातील कंपन्यांचे समभाग काही प्रमाणात कोसळले आहेत. बॉम्बे डाईंगचे समभाग १७. ३ टक्क्यांनी घसरले आणि बॉम्बे बर्माचे समभाग ६ टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे नेस वाडिया यांच्याविरोधात अभिनेत्री प्रीती झिंटा हिने २०१४ साली मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार देखील दाखल केली होती. वाडिया ग्रुपचे अनेक युनिट्स आहेत. ज्यात बॉम्बे डाइंग, बॉम्बे बर्मा ट्रेडिंग, बिस्किटांची विख्यात अशी ब्रिटानिया इंडस्ट्रीज, गोएअर एअरलाइन यांचा समावेश आहे.