सातारा: पळसावडे, ता.सातारा येथे गर्भवती वनरक्षक असलेल्या महिलेला व तिच्या पतीला माजी सरपंच, तसेच त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संतापाची लाट निर्माण झाली असून, सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
रामचंद्र गंगाराम जानकर व प्रतिभा जानकर (दोघे रा.पळसावडे) गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील रामचंद्र जानकर हा माजी सरपंच आहे. या प्रकरणी सिंधू बाजीराव सानप (वय २४, रा.दिव्यनगरी, सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार सिंधू सानप व त्यांचे पती हे दोघे वनरक्षक आहेत. दि. १७ रोजी सकाळी ९ वाजता पळसवडे येथे संशयित आरोपी प्रतिभा जानकर यांनी तक्रारदार सिंधू सानप यांना ‘तू कामावरील बायका का घेऊन गेली,’ असे म्हणत चापट मारत वाद घातला होता. यानंतर, दि. १८ रोजी दुपारी पुन्हा संशयित महिलेने फोन करून ‘तू वनक्षेत्रात यायचे नाही, आला तर मारेन,’ असे म्हणत दमदाटी, शिवीगाळ केली.
दि. १९ रोजी सकाळी ८ वाजता तक्रारदार व त्यांचे वनरक्षक पती सूर्याजी ठोंबरे हे काम करत असताना, तेथे संशयित आरोपी पती व पत्नी आले. संशयितांनी पुन्हा वाद घालत थेट तक्रारदार व त्यांच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तक्रारदार या गर्भवती असतानाही त्यांना मारहाण करण्यास सुरुवात झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले आहे. दगडाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी यावेळी संशयितांनी दिली.
या सर्व घटनेनंतर तक्रारदार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्भवती वनरक्षक महिलेला मारहाण झाल्याचे समोर आल्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली. सातारा तालुका पोलिसांनी रुग्णालयात जावून तक्रार घेतली. तक्रारीवरून माजी सरपंच व त्याच्या पत्नीवर शासकीय कामात अडथळा करून मारहाण केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.