ओडिसाच्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याला आदिवासी समुदायाच्या एका गरोदर महिलेसह अमानवी कृत्य केल्यामुळे निलंबित करण्यात आलं आहे. या गरोदर महिलेला पोलिस स्टेशनपर्यंत ३ किलोमीटर पायी चालायची वेळ आली. यासाठी महिला पोलिस जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.
मयूरभंज जिल्ह्यातील सराट पोलिस स्टेशन अंतर्गत मटकामी साही गावातून बिक्रम बिरूली नावाची व्यक्ती आपल्या ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीला घेऊन बाईकवरून प्रवास करत होता. रस्त्यात चेकींग दरम्यान या माणसाला रोखण्यात आलं. यावेळी पोलिस अधिकारी रिना बक्सलसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होत्या.
यावेळी हेल्मेट न घातल्यामुळे बिक्रमला चालान भरण्यास सांगितलं. यावेळी बिक्रमने माझ्याजवळ पुरेसे पैसै नाहीत आणि जे पैसै आहेत जे पत्नीला दवाखान्यात लागणार आहेत असे सांगितले. आता चालान कापल्यानंतर आरटीओमध्ये येऊन जमा करतो असंही त्यानं सांगितलं होतं. पण महिला पोलिस अधिकारी रिना यांनी त्याचे काहीही ऐकले नाही. या माणसाला गाडीत बसवून पोलिस स्थानकात घेऊन गेल्या.
या सगळ्यात बिक्रम यांची गरोदर पत्नी बराचवेळ त्याच ठिकाणी उभी होती. खूपवेळ वाट पाहिल्यानंतर या महिलेनं पोलिस स्थानकात जायचं ठरवलं पण पैसै नसल्यानं कोणतंही वाहन पकडू शकत नव्हती. नाईलाजाने ही महिला चालत पोलिस स्थानकात जायला निघाली. विशेष म्हणजे इतकं सगळं होऊनही या पोलिसानं गरोदर महिलेची अवस्था समजून घेतली नाही.
एटीएम कार्ड लबाडीने घेऊन पैसे लुबाडणाऱ्या सराईत आरोपीला अटक
रणरणत्या उन्हात या महिलेला ३ किलोमीटर चालावं लागलं. विक्रमनं सांगितलं की, ''मी पत्नीला पण गाडीत बसवून घेऊन चला असं सांगितलं, पण त्यांनी काहीही ऐकलं नाही. तिला एकटीला सोडून मला यायला लावलं.'' बिक्रमनं दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे गाडीचे सगळे कागदपत्र होते. फक्त हेल्मेट मात्र घातलं नव्हतं. या प्रकारानंतर मयूरभंजचे एसपी यासह ओआयसी रिना बक्सल यांना सोमवारी निलंबित करण्यात आलं आहे.