हापूड – युपीच्या हापूड जिल्ह्यात एका युवतीला तिच्याच घरच्यांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही युवती गरोदर असल्याचे समोर आले आहे. मुलीवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात ही मुलगी ७० टक्के भाजली असून गंभीर अवस्थेत तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सध्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
हापूड जिल्ह्यातील बहादूरगड येथील ही घटना आहे. ज्याठिकाणी एक २३ वर्षीय युवतीचे तिच्याच गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या संबंधातून मुलगी गर्भवती राहिली. ज्यावेळी ही माहिती तिच्या घरच्यांना मिळाली तेव्हा त्यांचा राग अनावर झाला. घरच्यांनी मुलीची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे कळाले. त्यानंतर कुटुंबाने तिला जंगलात घेऊन जात जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेत युवतीची आई आणि तिचा भाऊ सहभागी आहे. या दोघांनी मुलीवर पेट्रोल टाकून तिला आग लावली. ज्यात ती ७० टक्के भाजली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमी युवतीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या या युवतीवर उपचार सुरू आहेत. परंतु मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आई आणि भावाला अटक केली आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपींवर कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक राजकुमार अग्रवाल यांनी म्हटलं की, नवादा खुर्द येथील एका युवतीला तिच्या कुटुंबाने जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना कळाली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. या पीडित मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवले. तिथून हायर सेंटरला डॉक्टरांनी नेण्याची शिफारस केली. सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत. तिचा जबाब नोंदवला जाईल. स्थानिकांच्या माहितीनुसार, गुरुवारी ही घटना घडली. आई-भावाने मुलीला जिवंत जाळले. त्याआधी मुलीला मारहाणही करण्यात आली. त्यानंतर पेट्रोल ओतून तिला आग लावली. युवतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर गावकरी जंगलाच्या दिशेने धावत गेले तेव्हा हा प्रकार कळाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.