गोंदिया - धान खरेदी केंद्रावर विकलेल्या धानाचे ऑनलाईन बिल देण्यासाठी २०० रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व ग्रेडरला (संगणक चालक) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. तालुक्यातील ग्राम टेमणी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतील धान खरेदी केंद्रात शनिवारी (दि.७) ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदार व त्यांच्या पुतण्याचे धान ग्राम टेमणी येथील विविध सेवा सहकारी संस्थेंतर्गत असलेल्या धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेले होते. धानाचे वजन केल्यानंतर ग्रेडर सुशिल झनकलाल कटरे (२६) याने विकलेल्या धानाचे बिल ऑनलाईन करून देण्यासाठी प्रती बिलामागे १०० रूपये असे दोन्ही बिलांसाठी २०० रूपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गुरूवारी (दि.५) तक्रार नोंदविली. तक्रारीच्या आधारे पथकाने शुक्रवारी (दि.६) पडताळणी केली असता ग्रेडर सुशिल कटरे व संस्था अध्यक्ष नरेश चंदनप्रसाद तिवारी (३५) यांनी २०० रूपयांची मागणी केल्याने पथकाने शनिवारी (दि.७) धान खरेदी केंद्रात सापळा लावला असता ग्रेडर कटरे व संस्था अध्यक्ष तिवारी यांनी २०० रूपयांची मागणी करून पंचांसमक्ष रक्कम स्विकारल्याने पथकाने त्यांना रंगेहात पकडले. दोघांवर ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत लाप्रका कलम ७ (सुधारीत अधिनियम २०१८) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.