गोंदिया: छत्तीसगड व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या मरामजोब- कोसबी जंगलात नक्षलवादी व पोलीस यांच्यातआज सकाळी ८ वाजता चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांचे एक लाईव्ह प्रशर कुकर, बॉम्ब, परिपत्रकके, व नक्षलसाहित्य जप्त करण्यात आले.
चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया मरामजोब- कोसबी जंगल नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून ओळखले जाते. या भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.हरिष बैजल यांना मिळताच त्यांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. बैजल यांच्या नेतृत्वात ४० अधिकारी, पोलीस कर्मचारी व सी ६० च्या जवानांनी ही मोहीम राबविली. सकाळी ९.४५ वाजता चिचगडपासून १४ कि.मी अंतरावर असलेल्या मरामजोब- कोसबीच्या जंगलात सीपीआय माओवादी संघटनेचे ४० ते ५० नक्षलवादी जमले होते.पोलिसांना पाहून त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यांना प्रतीउत्तर म्हणून पोलिसांनीही त्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. नक्षलवादी ज्या ठिकाणी बसले होते. त्याठिकाणी एक लाईव्ह प्रशर कुकर, बॉम्ब, परिपत्रके, नक्षल साहित्य मिळाले. पोलीस आता कोंबींग आॅपरेशन राबवित आहेत. मागीलवर्षी याच जंगलात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले स्फोटके पोलिसांनी जप्त केले होते.