माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी आरोप प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या निवेदनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ईडीने परमबीर सिंग यांना निलंबित एपीआय सचिन वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करण्याबाबत आपली भूमिका काय होती? असा सवाल केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना सिंग यांनी धक्कादायक दावा केला आहे. सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तशा सूचना होत्या असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.
निलंबन झाल्यांनतर सचिन वाझेची २०२० मध्ये पुनर्नियुक्ती करण्यात आली होती. सर्व निलंबनाच्या प्रकरणांचा आढावा मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली केला जातो. त्यामध्ये काही सहआयुक्त आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीची कारणे पुनरावलोकन समितीच्या फाईलमध्ये आहेत, असे परमबीर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.
मी हे सांगू इच्छितो की, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यासाठी थेट दबाव होता. मला देखील तसे निर्देश देण्यात आले. आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तशा सूचना होत्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेमध्ये त्यांची पोस्टिंग आणि त्यांना तिथल्या काही महत्त्वाच्या युनिटचा कार्यभार देण्यासाठी मला सूचना मिळाल्या होत्या. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या सूचनेनुसार CIUकडे काही महत्त्वाची प्रकरणे सोपवण्यात आली होती. ज्याचे नेतृत्व सचिन वाझे याने केले होते. सचिन वाझे यानेही मला सांगितले होते की, त्यांना नोकरीत पुन्हा घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी त्याच्याकडे २ कोटी रुपयांची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट परमबीर सिंग यांनी ईडीला दिलेल्या माहितीत केला आहे.
राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच आपल्याकडे द्यायचे असा धक्कादायक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी दिलेला जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.