लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने तुम्हीसुद्धा बाधित असाल, तुमच्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना संसर्ग होऊ शकतो, असा दावा करुन एका अधिकाऱ्याला घर सोडण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाहीतर, ‘मी आमदाराचा माणूस आहे, तुमच्यावर काहीही आरोप लावीन’, अशी धमकीही त्यांना दिली.
विष्णूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक औदुंबर मस्के (३०) हे पश्चिमेतील गणेशनगर येथील राजवैभव सोसायटीत भाड्याने राहतात. त्यांना कोरोनाची लागण झाल्यास सोसायटी सील होईल, या भीतीने सोसायटीचे अध्यक्ष मंगेश सुर्वे आणि सदस्य भूषण पांडे यांनी मस्के यांना घर रिकामे करण्याची धमकी दिली. आमदाराची भीती दाखवून त्यांना सोसायटीत येण्यास मज्जावही केला. अत्यावश्यक सेवा देणाºयांना सोसायटीत मज्जाव करू नये, असा नियम असतानाही असा प्रकार घडला आहे. मस्के यांच्या तक्रारीवरुन विष्णूनगर पोलिसांनी सुर्वे आणि पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस ठाण्यातबोलावून केली मारहाणकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, या हेतूने कायद्यानुसार भाडेकरू सदनिकेत ठेवावेत, अशी समज घरमालकाला दिली होती. याचाच राग आल्याने पोलीस उपनिरीक्षक मस्के व त्यांच्या अन्य सहकाºयाने पोलीस ठाण्यात बोलावून मारहाण केल्याचा अर्ज राजवैभव सोसायटीचे अध्यक्ष मंगेश सुर्वे यांनी पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.