मुंबई - बँकेतून बोलत असल्याची बतावणी करत नागरिकांना गंडविणाऱ्या चोरट्यांनी नुकतेच परळच्या केईएम रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरला लक्ष्य करत चुना लावल्याचे समोर आले आहे. या महिलेच्या बँकेतील खात्याची माहिती घेऊन या चोरट्यांनी तिला १९ हजार ५०० रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
अंधेरी परिसरात राहणारी ही महिला डॉक्टर परळ येथील केईएम रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. या महिलेला अनोळखी नंबरहून फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून नवीन क्रेडिट कार्ड वेरिफिकेशन करायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याने महिलेच्या खात्याची इत्यंभूत माहिती विचारली. त्यानुसार महिलेनेही कोणतीही चौकशी न करता ती माहिती त्याला दिली. तसेच अवघ्या काही मिनिटांत त्या महिलेच्या खात्यातून पैसे तीन टप्प्यात काढण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला. नंतर त्या महिलेने बँकांच्या चौकशीसाठी आलेल्या फोन नंबरवर फोन केला असता तो फोन बंद येत होता. त्यानंतर डॉक्टर महिलेने तातडीने बँकेत चौकशी केल्यानंतर बँक कधीही खात्यासंदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी फोनवर घेत नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. त्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. महिलेने तात्काळ भोईवाडा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.