डोंबिवली: बतावणी करीत लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास करणा-या दुकलीला कल्याण गुन्हे अन्वेषण पोलिसांनी अटक केली आहे. नरेश विजयकुमार जैसवाल (वय ४०) रा. चेंबुर मुंबई आणि अनिल कृष्णा शेट्टी ( वय ४५) रा. नेतीवली नाका, कल्याण पूर्व अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. तर ३ लाख ७३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला आहे. दोघे भामटे विशेष करून वृद्धांना लक्ष करायचे आणि गंडा घालायचे.
थांबा पुढे खून झाला आहे, आमच्या शेठजीला मुलगा झाला आहे, तो गरीब महिलांना साड्या वाटप करीत आहे, अशा बतावणी करीत नागरिकांना गंडा घातला गेल्याच्या घटना काही महिन्यांपूर्वी कल्याण डोंबिवलीत घडल्या होत्या. दरम्यान, गुरूवारी रात्री कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार किशोर पाटील आणि पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र लांडगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की दोन संशयित कल्याण रेल्वे स्थानकासमोरील एस टी बस स्टॅण्ड येथे येऊन एस.टी ने बाहेरगावी जाणार आहेत.
या माहितीनुसार, वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप चव्हाण, संतोष उगलमुगले, पोलिस उपनिरिक्षक संजय माळी, पोलिस हवालदार पाटील, विलास कडू, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, अनुप कामत, पोलिस नाईक सचिन वानखेडे, पोलिस कॉन्स्टेबल लांडगे, मिथुन राठोड, गुरूनाथ जरग, गोरक्ष शेकडे, विनोद चन्ने, विजेंद्र नवसार, पोलिस हवालदार अमोल बोरकर आदिंच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा लावत दोघांची धरपकड केली. दोघांवर महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, विष्णुनगर व रामनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. संबंधित आरोपींना महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.