जळगाव : कारागृहात असलेल्या बंद्याला घरच्या जेवणाचा डबा देणे, जिल्हा कारागृहात न पाठविण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अनिल लोटन देवरे (वय ४१) या कारागृह रक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी भुसावळच्या दुय्यम कारागृहात रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील तक्रारदार महिलेचा मुलगा भुसावळच्या दुय्यम कारागृहात आहे. त्याला जिल्हा कारागृह जळगाव येथे न पाठविण्यासाठी व जेलमध्ये त्याला घरचे जेवणाचा डबा देणे, भेटू देण्यासह इतर सवलती देण्याच्या मोबदल्यात देवरे याने १० नोव्हेंबर रोजी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे महिलेने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील यांची भेट घेऊन तक्रार दिली. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते.
पाच दिवस तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर सोमवारी उपअधीक्षक पाटील यांनी निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,अशोक अहीरे, सुनील पाटील, रवीद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्धन चौधरी, प्रविण पाटील,महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांना सोबत घेऊन कारागृहातच सापळा रचला. महिलेकडून दोन हजार रुपये स्विकारताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.