नाशिक: येथील मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपुर्वीच येरवडा कारागृहात आलेल्या कैद्यांकडून येथील कारागृह सुरक्षारकावर दगडाने हल्ला चढविण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.१८) सकाळी घडली. या हल्ल्यात एक सुरक्षारक्षक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. प्रभुचरण नानाजी पाटील असे जखमी झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खुनाची शिक्षा भोगत असलेले दहा ते बारा कैद्यांनी सकाळी अचानकपणे त्यांचे बॅरेक परस्पर विना परवानगी बदलले. यावेळी कर्तव्यावर असलेले कारागृह सुरक्षा रक्षक पाटील यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी त्या कैद्यांना ‘बॅरेक का बदलले’ असे विचारले असता त्याचा राग मनात धरून या कैद्यांनी मिळून पाटील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काहींनी त्यांच्या डोक्यात दगड मारले. त्यांच्या हातापायांनाही या मारहाणीत गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने रक्तबंबाळ अवस्थेत कारागृह व्यवस्थापनाकडून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह हे इंग्रजकाळातील असून १९२७ साली ते अस्तित्वात आले आहे. या कारागृहाला मोठा इतिहास लाभलेला आहे. कारागृहाच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. कधी कारागृह अधीक्षकांच्या बंगल्याच्या आवारातून चंदनाचे वृक्ष कापून नेले जातात तर कधी कारागृहाच्या आवारात झाडांच्या अधारे बंदीवानांकडून आत्महत्या केली जाते? अशा विविध घटनांमुळे कारागृह नेहमीच चर्चेत असते. या कारागृहात राज्यभरातील कैदी शिक्षा भोगत आहेत. येरवडा तुरुंगातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरीत करण्यात आलेल्या बंदीवानांकडून हा जीवघेणा हल्ला कारागृह सुरक्षा रक्षकावर केला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृह सुरक्षा रक्षकांचीच ‘सुरक्षा’ धोक्यात सापडल्याचे बोलले जात आहे.