मुंबई : धारावीत पूर्ववैमनस्यातून घडलेल्या गोळीबारात खासगी कंत्राटदार रिझवान कासीम शहा पटेल(२९) जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. तीन व्यक्तींनी पूर्ववैमनस्यातून गोळ्या झाडल्याची तक्रार पटेल यांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांनी केलेल्या दाव्यानुसार तीन संशयितांकडे चौकशी सुरू आहे. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पटेल धारावी परिसरात घरदुरुस्ती, बांधकामाची कंत्राटे घेतात. संशयितांमध्ये त्यांचा सख्खा भाऊ, मेव्हणा आणि मित्राचा समावेश आहे. त्यापैकी भाऊ आणि मित्र घटना घडली, तेव्हा घटनास्थळी उपस्थित नव्हते.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या मेव्हण्याने केलेल्या दाव्यानुसार, ज्या बंदुकीतून गोळी सुटली, ती जखमी रिझवान यांचीच होती. त्यांनी बंदूक आपल्यावर रोखली, तेव्हा बचावासाठी धडपड केली. त्या झटापटीत बंदुकीतून गोळी सुटली. त्यात रिझवान जखमी झाले. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न, मारहाण, शस्त्र बाळगणे आणि त्याद्वारे जखमी करण्याबाबत धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नातेवाईकांमधील शत्रूत्वातून झालेला गोळीबार असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले असून अधिक तपास सुरू आहे.