गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: रायपूरच्या पंचपेडी नाका येथील जे के शाह एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कोचिंग क्लासेसच्या शाखेला करोडोंचा चुना लावल्याप्रकरणी रायपूर पोलिसांनी मालाड येथील चार्टर्ड अकाउंटंट (सीए) प्राध्यापक धवल पुरोहित यांना गुरुवारी रात्री अटक केली. ते सोशल मीडियावर "थर्टी एमएल प्रोफेसर" म्हणून प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वी रायपूर पोलिसांनी त्यांचा सहआरोपी अभिनंदन बाफना याला अटक केली, ज्याने त्यांचे नाव घेतल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्याने सांगितले.
रायपूर येथील क्लासेसचा बाफना हा प्रमुख होता. ज्याने सीए आणि सीएस विद्यार्थ्यांकडून १ कोटी रुपयांहून अधिक फी वसूल केली परंतु ती क्लासेसच्या मालकाकडे जमा न करता ते पैसे स्वतःच्या खासगी बँक खात्यात वळविले. या दोघांनी क्लासेसच्या मालकाला बनावट फीच्या पावत्याही सादर केल्या. ही बाब उघड झाल्यावर शिकवणीचे मालक जितेंद्र शाह (६१) यांनी रायपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार अटक करण्यात आलेला आरोपी पुरोहित हे एडनोवेट या ऑनलाइन कोचिंग इन्स्टिट्यूट टू सीए परीक्षेचे संस्थापक सदस्य आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओने ते प्रसिद्ध झाले होते. जिथे ते विद्यार्थ्यांना विचारत आहेत की 'एक क्वॉटर कितना होता है' ज्याला विद्यार्थी थर्टी एमएल असे उत्तर देतोय असे ते म्हणतात. याच कारणास्तव त्यांना "थर्टी एमएल प्रोफेसर" म्हणून ओळखले जाते.
रायपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी,२०१९ ते ३० नोव्हेंबर २०२० च्या दरम्यान हा गुन्हा घडला होता. पुरोहितच्या सूचनेनुसार बाफनाने फी च्या बनावट पावत्या तयार करून क्लासेस मालक शहा यांच्याकडे जमा केल्या. त्याच्या चौकशीत पुरोहितचे नाव उघड झाल्यावर आमचे पथक मुंबईत दाखल झाले. ते मालाडला राहत असुन त्यांना बोरिवलीतील मॉल जवळून अटक करण्यात आल्याचे साहू यांनी नमूद केले. त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये प्रकरणाशी संबंधित डेटामुळे एक मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. तक्रारदार शाह हे खार पश्चिमचे रहिवासी असून जेके कोचिंग क्लासेसचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. जे सीए आणि सीएस अकादमीमध्ये प्रसिद्ध असून त्यांच्या देशभरात ५२ हुन अधीक शाखा आहेत.