मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ) गुरूवारी रात्री नालासोपारा येथील सोपारा गावात भांडार आळी येथे छापे टाकून वैभव राऊत (वय - ४०) याच्यासह आणखी दोघांना अटक केली. शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर अशी या दोघांची नावे असून गोंधळेकरला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले. स्फोटकांसह वैभवला अटक करण्यात आली. वैभव याच्या नालासोपारा येथील घरातून आणि दुकानातून पोलिसांनी वीस गावठी बाॅम्ब, बाॅम्ब बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. या तिघांच्या रडारवर पुरोगामी विचारसरणीच्या बड्या व्यक्ती आणि काही ठिकाणे होती. आणखी सुमारे ३५ बाॅम्ब बनतील इतके साहित्य सापडल्याने त्यांचा मोठा घातपात घडविण्याचा कट होता असल्याचे एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
सोपारा गावातील भांडार आळीमध्ये वैभव आपल्या कुटुंबासोबत राहतो. गेल्या तीन आठवड्यापासून वैभव एटीएसच्या निशाण्यावर होता. त्याच्या संशयास्पद हालचाली आणि काॅल रेकाॅर्ड याच्यावरून शुक्रवारी मध्यरात्री दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरावर एटीएसने धाड टाकली. वैभवला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेण्यात आली. घरामध्ये आठ गावठी बाॅम्ब सापडले. चौकशीत वैभव याने जवळच एक दुकानाचा गाळा घेतला असल्याचे समोर आले. या गाळ्याची झाडाझडती घेतली असता त्यावेळी गाळ्यामध्ये असलेला स्फोटकाचा साठा पाहून पोलिसही हादरून गेले. तब्बल १२ तयार गावठी बाॅम्ब गळ्यातून, ८ बॉम्ब घरातून आणि सुमारे ३५ बाॅम्ब बनतील एवढे साहित्य सापडले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बाॅम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच फाॅरेसिक पथकाला बोलावून घेतले. प्राथमिक तपासात वैभवकडे सापडलेली स्फोटके ही बाॅम्ब बनविण्यासाठी वापरत असल्याचे उघड झाले आहे. फाॅरेसिंकच्या अंतिम अहवाल्यानंतर ही स्फोटके नेमकी कोणती आहेत ते सांगता येईल असे एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. वैभव नालासोपारा येथेच राहणाऱ्या शरद कळसकर यांच्या वारंवार संपर्कात होता. शरद हा वैभव याच्या घरानजीक राहत असल्याने एटीएसचे पथक त्याच्याही घरी धडकले. शरद याला ताब्यात घेऊन त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी काही पुस्तके आणि कागदपत्र सापडली. बाॅम्ब बनविण्याची प्रक्रिया याची माहीती देणारी ही पुस्तके असल्याचे एटीएसने म्हटले आहे. दोघांच्या संपर्कात सुधन्वा गोंधळेकर याला पुणे येथून अटक करण्यात आली. सुधन्वा हा मूळचा साताऱ्याचा असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले जात आहे.
स्फोटकांचा साठ्यात काय सापडलं ?
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वीस गावठी बाॅम्ब, दोन जिलेटीन काड्या, चार इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर, २२ नाॅन इलेक्ट्राॅनिक डिटोनेटर्स, सफेद रंगाची दीडशे ग्रॅम पावडर, सेफ्टी फ्यूज, पाॅयझन लिहिलेल्या द्रव्यच्या एक लिटरच्या दोन बाटल्या, १० बॅटरींचा बाॅक्स, सहा वाॅल्टची बॅटरी, सोल्डरींग मशीन, तीन स्वीच, तीन पीसीबी सर्किट, सहा बॅटरी कनेक्टर, दोन बॅटरी कंटेनर, चार रिले स्विच, सहा ट्रान्झीटर्स, मल्टीमिटर, वायरचे तुकडे, कागदावर बाॅम्ब बनविण्यासाठी काढण्यात आलेले रेखाचित्र तसेच इतर साहित्य सापडले. ही स्फोटके त्यांनी आणली कुठून याचा शोध पोलिस घेत आहेत.