सिडको : कोरोनाच्या आजारात उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विकणाऱ्या दोघा संशयितांना सापळा रचून पोलिसांनीअटक केली आहे. या प्रकरणात आणखी संशयित असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी दिली.
सिडकोतील राणेनगर बोगद्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोन इसम दोन रेमडेसीविर इंजेक्शन काळ्या बाजारात ४८ हजार रुपयांना विकणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती . ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांना कळविली. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून त्यांनी इंजेक्शन देणाऱ्या इसमाला त्याच्या मोबाईलवर कॉल केला.कारमध्ये (एमएच ०४ ए वाय ३७५१) बसलेल्या व्यक्तींना पैसे देऊन त्याने संशयितांकडे इंजेक्शन मागितले. एका इंजेक्शनची किंमत पाच हजार 400 रुपये दोन इंजेक्शन काळया बाजारात रुपये ४८ हजार रुपयांना विक्री केले जात होते. याच वेळी अंबड पोलिसांनी छापा टाकून संशयित अमोल रमेश देसाई (३६ , रा . विनयनगर) व निलेश सुरेश धामणे (४१, रा.कॉलेज रोड) यांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा सिटी कारसह इंजेक्शन व काही रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात संशयित देसाई व धामणे यांच्याविरुद्ध अत्याावश्यक सेवा वस्तु कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना शनिवारी न्यायालयात उभे केले असतांना न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संशयितांनी इंजेक्शन कोठून आणले आणि यामध्ये अजून कोण संशयित सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे हे पुढील तपास करीत आहेत.