- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : राज्य पोलिस दलातील गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या निरीक्षकांच्या पदोन्नतीला आता मुहूर्त मिळाला आहे. येत्या काही दिवसांत १५२ अधिकाऱ्यांना सहायक आयुक्त, उपअधीक्षक म्हणून बढती दिली जाणार आहे. त्याबाबतचा अंतिम प्रस्ताव गृहविभागाला सादर केला आहे. गेली ३०, ३२ वर्षे कार्यरत असलेले हे अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून, त्यांच्या वर्दीवरील लाल पट्टी होळीच्या मुहूर्तावर हटवली जाईल, अशी माहिती गृहविभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
पोलिस दलात १९९१ व ९२ या साली उपनिरीक्षक म्हणून भरती झालेल्या अधिकाऱ्यांपैकी १६० जणांना ऑक्टोबर २०२१ मध्ये सहायक आयुक्त, उपअधीक्षक म्हणून बढती दिली. त्यानंतर सव्वा वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पदाेन्नतीची नवीन यादी जारी केली जात नव्हती. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये निरीक्षकांच्या बदल्यावेळी ३२ अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरवून त्यांना तत्कालीन पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे बढतीचे आदेश लवकर निघतील, अशी अपेक्षा होती. मात्र मार्च महिना उजाडावा लागला. आता पीआयचे प्रमोशन झाल्याने या पदाच्या आणखी जागा रिक्त होतील, त्यामुळे महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीची बैठक घेऊन एपीआय, पीएसआयच्या बढतीची संख्या निश्चित होईल.
पदोन्नती आली १७५ वरून १५२ जणांसाठीएसीपीच्या बढतीसाठी सेवाज्येष्ठतेनुसार १७५ अधिकारी पात्र ठरत होते. मात्र त्याला विलंब लागल्याने त्यातील अनेकजण निवृत्त झाले, तर काहींनी बढती नाकारली आहे. त्यामुळे सध्या १५२ जणांना बढती दिली जाणार आहे.