उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये 45 कोटींच्या संपत्तीचा मालक असलेल्या शिक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश गौतम असं या शिक्षकाचं नाव असून त्याची पत्नी पिंकीने त्याच्या हत्येचा कट रचला. पिंकीचं एका व्यक्तीसोबत अफेयर होतं. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. पोलिसांनी शिक्षक राजेश गौतम याच्या मुलाशी बोलून या घटनेची माहिती घेतली. चिमुकल्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश गौतम आणि पिंकी यांना दोन मुलं आहेत. पोलीस राजेशच्या मुलाशी बोलले असता त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी तो त्याच्या वडिलांसोबत फिरायला जात होता, मात्र त्याच्या आईने त्याला घरातील बाथरूममध्ये कोंडून ठेवले होतं. 9 वर्षांच्या मुलाने पोलिसांना सांगितले की, "4 नोव्हेंबरला जेव्हा वडिलांची हत्या झाली तेव्हा मी सकाळी कपडे घालून वडिलांसोबत जायला तयार झालो."
"मी बाहेरही पोहोचलो होतो, तेव्हा माझ्या आईने मला कोणत्या तरी बहाण्याने आत बोलावून बाथरूममध्ये नेलं आणि बाहेरून दरवाजा बंद केला. मी आतून ओरडत होतो की मला पप्पांसोबत जायचं आहे, पण ती म्हणू लागली की, तुला अभ्यास करायचा आहे, तुला जायची गरज नाही, त्यानंतर पप्पा निघून गेले." राजेश गौतम यांनी 2021 मध्ये कानपूरमधील कोयला नगर येथील त्यांच्या प्लॉटवर बांधकाम सुरू केलं होतं. यासाठी राजेशने शैलेंद्र सोनकर याला कामावर ठेवले होते.
बांधकामाच्या संदर्भात शैलेंद्र राजेशच्या घरी जायचा. यावेळी त्याची राजेशची पत्नी पिंकी हिच्याशी भेट झाली. पिंकी दिसायला सुंदर होती, पिंकीही शैलेंद्रशी बोलू लागली आणि त्यांच्यात अफेअर सुरू झालं. यानंतर पिंकीने एकदा राजेशला जेवणात विष दिले, मात्र रुग्णालयातील उपचारानंतर राजेशचा जीव वाचला. यानंतर पिंकीने राजेशच्या हत्येची सुपारी दिली होती.
पिंकीने राजेशची हत्या हा एक अपघात वाटावा आणि राजेशच्या नावावर असलेला तीन कोटी रुपयांचा विमा क्लेम मिळावा म्हणून कट रचला. शिक्षक असण्यासोबतच राजेश प्रॉपर्टीचं कामही करायचा. 4 नोव्हेंबरला राजेश घरातून फिरायला निघाला असताना शैलेंद्र आणि सुपारी घेणाऱ्यांनी त्याला कारने चिरडलं. पोलीस हा अपघात मानत होते, मात्र राजेशच्या भावाने पोलिसांना हत्येची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.