मडगाव - अंगावर शहारे आणणाऱ्या बसुराज बारकी खून खटल्यात आपल्याला माफीचा साक्षीदार करावा यासाठी या प्रक़रणातील एक संशयित सुरेशकुमार सोळंकी याने केलेल्या अर्जाला सरकारी वकील व्ही. जे. कोस्ता यांनी सहमती दिली असली तरी अन्य एक संशयित पंकज पवार याची बाजू मांडणारे अॅड. राजीव गोमीस यांनी हरकत घेतल्याने ही सुनावणी 4 ऑक्टोबपर्यंत तहकूब करण्यात आली.दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायोनोरा लाड यांच्या न्यायालयात सोमवारी हे प्रकरण सुनावणीस आले असता. संशयित सोळंकी याला माफीचा साक्षीदार करण्यास अभियोग पक्षाची कुठलीही हरकत नसल्याचे सरकारी वकील कोस्ता यांनी सांगितले. मात्र, पवार याच्या वकिलानी सोळंकी याला ही सवलत देण्यास विरोध केला. आपली हरकत लेखी स्वरुपात ते 4 ऑक्टोबरला मांडणार आहेत. दरम्यान, संशयित पंकज पवार याने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला असून या अर्जावरही 4 रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, आपल्या अनैतिक संबंधात व्यत्यय येत असल्यामुळे आपला पती बसुराव बारकी याचा आपल्या मित्रच्या सहाय्याने खून करुन नंतर निर्घृणरित्या त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची वासालात लावण्याचा आरोप असलेल्या कल्पना बारकी हिच्यासह पंकज पवार, आदित्य गुज्जर, अब्दुल करीम शेख व सुरेशकुमार सोळंकी यांच्यावर ठेवण्यात आला होता. कल्पनाने आदित्यच्या सहाय्याने आपल्या पतीचा गळा दाबून खून केला. नंतर पंकज व अब्दुलच्या सहाय्याने त्या मृतदेहाचे तुकडे करुन ते गोणपाटात भरुन जंगलात नेऊन टाकले. 2 एप्रिल 2018 रोजी कुडचडे येथे एका फ्लॅटमध्ये हे कृत्य घडले होते. मात्र या खुनाला वाचा तब्बल एका महिन्याने फुटली होती.आपल्या पतीचा आपण कशारितीने खून केला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची कशी वासालात लावली याबद्दलची सर्व माहिती कल्पनाने सुरेशकुमार याला दिली होती. ज्या नायलॉन दोरीने बसूराजचा गळा आवळला ती दोरी नष्ट करण्याचे काम सुरेशकुमारने केले होते. नंतर सुरेशकुमारने केपे न्यायालयासमोर दिलेल्या स्वेच्छा जबाबात ही सर्व माहिती उघड केली होती. आपल्या इतर सहका:यांविरोधात साक्ष द्यायला आपण तयार असल्याचे त्याने सत्र न्यायालयात सांगितले होते.
सुरेशकुमारला माफीचा साक्षीदार करण्यास अभियोग पक्षाची ना हरकत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 9:10 PM