आर्णी (यवतमाळ) : शहरातील ड्रीम लॅन्ड सीटी या उच्चभ्रूंच्या वस्तींमध्ये काही सजग नागरिकांना आक्षेपार्ह हालचाली आढळून आल्या. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ दखल घेवून संबंधितांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात पाचारण केले. यातून धक्कादायक माहिती पुढे आली. आर्णी सारख्या लहानशा गावातून आंतरराज्यीय नेटवर्क सुरू असल्याचे उघड झाले. यामध्ये देहविक्रीसाठी अल्पवयीन मुलीची खरेदी करण्यात आली. सतर्कतेमुळे बंगळूरच्या मुलीची सुटका झाली. तिला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.ड्रीम लॅन्ड सीटी येथे एका संशयित महिलेकडून देहविक्रीचे रॅकेट चालविले जाते. ती आंतरराज्यीय स्तरावरच्या रॅकेटची सक्रीय सदस्य आहे. परिसरातील नागरिकांना त्या महिलेवर संशय होताच. दोन दिवसापूर्वी एक अल्पवयीन मुलगी दोन तरुणांसोबत दुचाकीवरून आली. ती त्या महिलेच्या घरी वास्तव्याला होती. त्या मुलीची विक्री केली जाणार त्यापूर्वीच ठाणेदार पितांबर जाधव पथकासह तेथे पोहोचले. ती महिला, अल्पवयीन मुलगी व दोन युवकांना ताब्यात घेतले.
बंगळूर सीटी पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होता. संशयितांच्या कबुली जबाबातून देहविक्रीचे रॅकेट उघड होताच आर्णी पोलिसांनी बंगळूर सीटी पोलिसांशी संपर्क केला. मुलीचे आई-वडील व पोलीस जमादार संतोष दासर, पद्मावती बबले हे सोमावरी आर्णी पोहोचले. त्यांनी आरोपी दत्ता हिरामन राठोड (३०), अर्जुन गणेश आडे (२०) रा. महादापूर ता. माहूर जि. नांदेड यांना अटक केली. आर्णी पोलिसांच्या सतर्कतेमुळे देहविक्रीच्या व्यवसायात लोटली जाणारी अल्पवयीन मुलगी बचावली. ही कारवाई ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार विजय चव्हाण, जया काळे, मिथून जाधव, महेश गावंडे यांनी केली.फेसबुकवरून ओढले प्रेमाच्या जाळ्यातविवाहित असलेला आरोपी दत्ता राठोड याने फेसबुकवरून बंगळूरच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला भावनिक करीत तु आली नाही तर आत्महत्या करतो, हाताची नस कापतो असे म्हणून नागपूर येथे येण्यास भाग पाडले. ती अल्पवयीन मुलगी गुरुवारी नागपूरला पोहोचली. तेथून दत्ताने साथीदार अर्जुन याच्या मदतीने दुचाकीवरून त्या मुलीला आर्णीत आणले. तिला ड्रीम लॅन्ड सीटी येथे राहणाऱ्या महिलेच्या घरी ठेवले. अशा प्रकारे अनेक मुलींची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्या महिलेच्या मोबाईलचे चॅटींग प्रतिष्ठितांशीआंबट शौकिनांची हौस पुरविण्यासाठी अल्पवयीन मुलींना फसवणूक देहविक्रीत लोटले जात होते. संशयित महिलेचा मोबाईल पोलिसांनी तपासला असता त्यामध्ये अनेक प्रतिष्ठितांची नावे पुढे आली. महिलेने प्रतिष्ठितांशी चॅटींग केल्याचे आढळून आले. यावरुन ती महिला मुली पुरविण्याचे रॅकेट चालवित असल्याचे सिद्ध होते. मात्र अधिकृत तक्रार नसल्याने आर्णी पोलीस चौकशीशिवाय काहीही करू शकले नाही. बंगळूर पोलिसांनीसुद्धा त्या महिलेला गुन्ह्यात अटक करणार असल्याचे सांगून ही कारवाई पुढील टप्प्यात केली जाईल, असे स्पष्ट केले. आर्णी शहरासह तालुक्यात चॅटींगमध्ये असलेल्या प्रतिष्ठितांच्या नावाची चर्चा रंगत आहे.