लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन बेकायदा टॅप केल्याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शुक्ला यांना १ एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे.
रश्मी शुक्ला यांनी पोलीस तपासाला सहकार्य करू, अशी हमी न्या. पी.बी. वराळे व न्या. एम.एम. मोडक यांच्या खंडपीठाला दिली. १६ ते २३ मार्चदरम्यान सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत कुलाबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.आर. मोहिते यांना तपासासाठी सहकार्य करू, असे शुक्ला यांच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाला आश्वासन दिले. राजकीय हेतूने व नाहक आपल्यावर आरोप करून गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे शुक्ला यांनी याचिकेत म्हटले आहे. गुरुवारी ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्या. पी.बी. वराळे व न्या. एस.एम. मोडक यांच्या खंडपीठापुढे ही याचिका नमूद केली. खासदार संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे बेकायदा फोन टॅप केल्याबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त (स्पेशल ब्रँच) राजीव जैन यांनी तक्रार केली. शुक्ला यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम १६५ व टेलिग्राफ ॲक्टचे कलम २६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
अंतरिम मागणीला विरोधn‘तपास सुरुवातीच्या टप्प्यावर आहे आणि इतर अधिकाऱ्यांची गुन्ह्यातील भूमिका निश्चित करायची आहे. nत्यांच्यावर नोंदविण्यात आलेले गुन्हे जामीनपात्र आहेत, अटकेचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे म्हणत मुख्य सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी शुक्ला यांच्या अंतरिम मागणीला विरोध केला. nन्यायालयाने जेठमलानी यांनी दिलेले आश्वासन मान्य करत पोलिसांना शुक्ला यांना १ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले.