सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दुकानातील एका व्यापाऱ्यांवर शनिवारी हल्ला केल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान हल्ला करणाऱ्या इसमाला व्यापाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून ऐन दिवाळी सणा समोर वाढलेली गुन्हेगारी मोडीत काढण्याची मागणी करण्यात आली.
उल्हासनगरात गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याने, पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. दोन दिवासापूर्वी ड्रॅगसह एका इसमाला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली. कॅम्प नं-३ उल्हासनगर स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पवन गुरनानी यांचे दुकान असून त्या शेजारी प्रजापती नावाच्या इसमाचे इडलीची टपरी आहे. शनिवारी एका इसमाने बर्फ तोडण्याचा शस्त्राने पवन व प्रजापती यांच्यावर हल्ला करून पळून गेला. यामध्ये पवन गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकारने व्यापाऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले. हल्ला करणारा इसम व्यापाऱ्याना दिसताच त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र व्यापाऱ्यांत आक्रोश असल्याने, त्यांनी रविवारी दुकाने बंद ठेवून दुपारी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले. ऐन दिवाळी सणा समोर व्यापाऱ्यावरील हल्ल्याने, भितीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारी मोडीत काढण्याची मागणी त्यांनी केली.
शहरात खून, बलात्कार, घरफोडी, हाणामारी, फसवणूक, वाहन चोरी आदी गुन्ह्यात वाढ झाली. असा आरोप राजकीय नेत्यांसह व्यापाऱ्यांनी केला. तसेच शिवसेना युवसेनेने गेल्या आठवड्यात शहारातील निर्जनास्थळी होत असलेल्या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी लयाला गेल्याचा आरोप केला. तसेच अश्या निर्जनास्थळाचे फोटो व माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाला दिली होती. दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी विजय कांबळे यांनी पोलिसांना पत्र देऊन संभाजी चौक गुन्हेगारांचा अड्डा झाल्याची तक्रार केली. एकूणच शहरात गुन्हेगारी वाढल्याने, सर्वसामान्य नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप विविध पक्षाचे नेते करीत आहेत.