मुंबई : मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांची पोस्टर्स लावून निषेध व्यक्त करण्यात आला. ही पोस्टर्स पादचाऱ्यांचा पायाखाली येतील अशा पद्धतीनी लावली होती. घटनेची माहिती मिळताच पायधुनी पोलिसांनी पोस्टर्स हटविले असून, अधिक तपास सुरू केला आहे.फ्रान्समधल्या इतिहास शिक्षकाच्या हत्येचे प्रकरण गाजत असताना गुरुवारी फ्रान्स शहरात चाकूहल्ला झाला. यामध्ये तिघांचा बळी गेला. दरम्यान, आपण अशा प्रकारच्या कोणत्याही दबावापुढे झुकणार नाही, शिक्षकाची हत्या म्हणजे इस्लामी अतिरेक्यांचा हल्ला असल्याचे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांनी म्हटले. त्यानंतर फ्रान्स सरकारने इस्लामी कट्टरपंथीयांविरुद्ध मोहीम सुरू करून छापे मारण्यास सुरुवात केली. त्यांच्या या विधानानंतर मुस्लीमबहुल देशांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुंबईतही याचे पडसाद पाहावयास मिळाले.गुरुवारी मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर त्यांची पोस्टर्स लावून निषेध करण्यात आला. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी सांगितले.
ठाण्यातही करण्यात आली निदर्शने ठाणे - मुंबईनंतर ठाण्यातील रस्त्यांवरही फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे पोस्टर चिकटवून निदर्शने करण्यात आली. ठाण्यातील राबोडी परिसरात मशिदीजवळ नगरसेवक नजीब मुल्ला आणि मुस्लिमबांधवांनी आंदोलन, निदर्शने करून या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रान यांच्याविरोधात मुस्लिम देशांतून आंदोलने होत आहेत. मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे त्यांनी समर्थन केले होते. प्रत्येक मुस्लिम आणि हिंदूंच्या हृदयात या वक्तव्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. ज्यांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला, त्यांच्याबद्दल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी चुकीचे वक्तव्य केले आहे, ते आम्ही कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितलेे.