जयपूर - राजस्थानमधील करौली परिसरात जमिनीच्या वादावरुन मंदिराच्या पुजाऱ्याची जाळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. राजस्थानातील करौली येथील बुकना या गावी मंदिराच्या जमिनीवरून दोन गटामध्ये झालेल्या वादात पुजाऱ्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्यात आलं. जळालेल्या गंभीर अवस्थेत पुजाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर, पीडित कुटुंबीयांन अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. याप्रकरणी पीडित कुटुबीयांनी आरोपींना पोलिसांनी पाठिशी घातल्याचा आरोप केला आहे. तसेच, आम्हाला 50 लाख रुपये आर्थिक मदत आणि एकास सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत एका आरोपीस अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी घडली. मंदिराच्या जागा बळकावण्यासाठी कैलास मीणा, शंकर, नमो, रामलखन मीणा आदी छप्पर टाकत होते. यादरम्यान वयस्कर पुजारी बाबूलाल यांनी ते सुरु असलेले काम थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. त्यामध्ये पुजारी होरपळून गेले होते. मंदिराच्या परिसरातील अतिक्रमण रोखल्यामुळेच त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
याप्रकरणी पुजाऱ्याच्या पीडित कुटुंबीयांनी काही पोलिसांवर आरोप केले आहेत. आरोपींना पाठिशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करत आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही पीडित कुटुंबीयांनी केली आहे. आम्हाला बाबुलाल यांच्या अंत्यसंस्कारातही सामिल होता आले नाही, त्यांचे अंत्यदर्शनही घेता आले नसल्याची खंत नातेवाईकांनी बोलून दाखवली. तसेच, आम्हाल 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, व कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणीही नातेवाईकांनी केली आहे.
करौलीच्या बुकना गावात पुजार्याला जिवे मारण्यात आले. बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात पुजाऱ्याच्या वेदनादायक मृत्यूमुळे राजधानी जयपूरसह करौली जिल्ह्यातील पुजारी आणि ब्राह्मण समाज या घटनेचा तीव्र विरोध करत आहे.
ब्राह्मण समाज, पुजारी संघ, ब्राह्मण समाज, बजरंग दल, भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करून आरोपींना अटक केली आहे आणि त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. यासह पीडितेच्या कुटूंबाला 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई आणि सरकारी नोकरीची मागणी करण्यात आली आहे. आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. इथल्या घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक मृदुल कच्छवा यांनी विशेष पथके तयार केली आणि या घटनेतील मुख्य आरोपी कैलाश मीनाला अटक केली, तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.