लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: डेअरी कर्मचाऱ्यांच्या केंद्रीय भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) दावे निकाली काढून देण्याचे आमिष दाखवत या कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी सीबीआयने पीएफ विभागाचा वरिष्ठ सामाजिक सुरक्षा अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. पीएफ विभागानेच याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. पीएफ विभागाच्या कांदिवली येथील कार्यालयात संबंधित अधिकारी कार्यरत होता. सध्या त्याची बदली अन्य राज्यांत झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, हे प्रकरण २०१९ ते २०२१ या कालावधीमधील असून डेअरीमधील या दोन कर्मचाऱ्यांनी पीएफ विभागाच्या अधिकाऱ्यासोबत संगनमत केले होते. डेअरीमधील ज्या कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या पैशांचे दावे पूर्ण करून द्यायचे होते, त्याकरिता या लोकांनी संबंधित कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये उकळले होते.
तीन अधिकाऱ्यांनी संगनमताने केला घोटाळा
- या त्रिकुटाने एकूण ६७ प्रकरणांत २ कोटी २९ लाख रुपयांचे दावे निकालात काढून दिले आहेत आणि त्या बदल्यात लाखो रुपये कमवले असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे.
- या सर्व प्रकरणांची आता पडताळणी केली जात आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीमध्ये डेअरीतील एका कर्मचाऱ्याने पीएफ अधिकाऱ्याच्या पत्नीच्या बँक खात्यात ३ लाख ५३ हजार रुपये जमा केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
- तर डेअरीच्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने २०१९ ते २०२१ या कालावधीमध्ये संबंधित १ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा केले होते.
- डेअरीमधील या दोन कर्मचाऱ्यांनी पीएफ विभागाच्या अधिकाऱ्यासोबत संगनमत केले होते.