मुंबई - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं कनेक्शन मुंबईशी जोडले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ऐन प्रजासत्ताक दिनादिवशी मुंब्रा येथे जाऊन उमत मोहम्मदीया ग्रुपच्या संपर्कात असलेल्या तलाह ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरीक (२४) या तरुणास अटक केली होती. या तलाहने १५ हजार रुपये बँकेमार्फत जम्मू काश्मीरला पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, महाराष्ट्र एटीएस सर्व बाजूंनी अधिक तपास करत असल्याचे एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अन्न आणि पाण्यातून केमिकल हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या १० जणांना एटीएसने कारवाई करत औरंगाबाद आणि मुंब्रा येथून अटक केली होती. सर्वात शेवटी एटीएसने मुंब्रा येथील दोस्ती प्लॅनेट एमरॉल्ड टॉवरमधून तलाहला अटक केली होती. त्याच्या चौकशीत ही खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
तलाहने त्याच्या बँक खात्यातून जम्मू - काश्मीरमध्ये १५ हजार रुपये पाठविल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, त्याने पुलवामा हल्ल्याआधी पैसे पाठविले होते का?, ते कोणाला पाठविले होता ?, या बँक व्यवहारामागील उद्देश काय ? तसेच या व्यवहारामागे पुलवामा हल्ल्याचा काही संबंध आहे का ? अशा सर्व बाजूंनी एटीएस तपास करत आहेत. राज्य एटीएसने मोठी कारवाई करत औरंगाबाद येथील संभाजीनगरातील चार आणि मुंब्य्रातील पाच अशा एकूण नऊ जणांना 22 जानेवारी रोजी अटक केली होती. यानंतर २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला तलाह याला अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून एटीएसने लॅपटॉप, राऊटर, काही मोबाईल, हार्ड डिक्स, टॅबलेट, पेनड्राइव्ह जप्त केले होते. जप्त केलेल्या लॅपटॉपमधून एटीएसला महत्वाच्या धाग्यादोऱ्यांची माहिती मिळण्याची शक्यता होती. तलाह हा विक्रोळी येथे यापूर्वी राहत होता. मात्र, सात - आठ महिन्यांपूर्वी तलाहने मुंब्रा येथे आपल्या आजोबांकडे राहण्यास गेला होता. त्याच्यासोबत आजोबा, आई राहत असे तर वडील नोकरीच्या निमित्ताने दुबईत वास्तव्याला आहेत. आजोबांच्या घरी तलाह दहशतवादी कट रचत होता.