जळगाव: खंडणी व फसवणूक प्रकरणात ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्यात शनिवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाचा जबाब नोंदविला. तीन तास ही प्रक्रिया चालली. ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात आलेल्या एक कोटीच्या रोकडची मोजणी सुरू होती. तेव्हा विचारणा केल्यावर ॲड. चव्हाण यांनी ‘एक कोटी आपलेच’ अशा शब्दांत उत्तर दिले होते, असा जबाब या बांधकाम व्यावसायिकाने नोंदविल्याचे सांगण्यात आले.
सूरज सुनील झंवर (सुहास कॉलनी, जळगाव) यांनी १ कोटी २२ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार ॲड. प्रवीण पंडित चव्हाण (रा. सुमंगल अपार्टमेंट, मोदीबाग, शिवाजीनगर, पुणे), शेखर मधुकर सोनाळकर (रा. नयनतारा अपार्टमेंट, जळगाव), उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याचा तपास एसआयटी करीत आहे. शुक्रवारी फिर्यादी सूरज झंवर यांचा जबाब नोंदविला. शनिवारी मोरे यांचा जबाब नोंदविला.
‘तो’च जबाबबांधकाम व्यावसायिक असल्याने ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात येणे-जाणे असायचे. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांच्या कार्यालयात गेलो. तेव्हा ॲड. प्रवीण चव्हाण व त्यांचे सहकारी ॲड. मोहित माहिमतुरा हे पैसे मोजत होते. पैशांविषयी विचारणा केल्यावर ॲड. चव्हाण यांनी ही रोकड उदयने पाठविली असून ती रक्कम आपलीच आहे, असे उत्तर दिले होते. त्यातील एक लाख रुपयांची रोकड ॲड. मोहित माहिमतुरा यांना दिली गेल्याचे मोरे यांनी जबाबात म्हटले आहे.
आणखी पुरावेयापूर्वीच आपण सीबीआयसमोर जबाबासह पुरावे सादर केले आहेत. पुण्यातील एका दिग्गज बांधकाम व्यावसायिकासंदर्भात पुरावे देणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. मूळचे जळगावचे असलेले मोरे हे सकाळी जळगावात आले आणि जबाब नोंदविल्यानंतर ते पुण्याकडे रवाना झाले आहेत.