लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश खुद्द कृष्ण प्रकाश यांनी केला. कृष्णप्रकाश यांनी वेशांतर करून सापळा रचून गुन्हेगाराला जेरबंद केले. निगडी येथे शनिवारी (दि. २६) रात्री ही कारवाई करण्यात आली.
रोशन बागुल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, आरोपी रोशन बागुल हा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांचा मित्र असल्याचे सांगून सामान्य नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना मिळाली. त्यामुळे कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर करून सापळा रचून एका हॉटेलमध्ये आरोपी रोशन बागुल समोर जाऊन बसले. आपल्याला काम करून घ्यायचे आहे, असे भासवून कृष्ण प्रकाश यांनी आरोपी रोशन बागुल याला पैसे दिले. ती रक्कम स्वीकारताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश त्यांच्या खऱ्या रूपात आले. आरोपी सोशल बागुल याच्यासह दोन महिलांना पोलिसांनी पकडले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह शस्त्र विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, हुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
घर मालकाकडून उकळली खंडणीआरोपी रोशन बागुल हा भाडेतत्त्वावरील घरात राहत होता. आपण पोलिस अधिकारी आहोत, असे सांगून धमकी देऊन त्याने घर मालकाकडून देखील खंडणी उकळण्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्याकडे पोलिसांचे बनावट ओळखपत्र मिळून आले. खंडणी उकळणारे हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून त्यांनी आणखी किती जणांना धमकावून खंडणी उकळले आहे याचा तपास पोलीस घेत आहेत.
वेषांतरामुळे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश पुन्हा चर्चेतपोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे सातत्याने चर्चेत राहणारे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी वेशांतर करून काही पोलीस ठाण्यांना रात्री भेट दिली होती. त्यामुळे कामचुकार पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी वेशांतर करून खंडणी उकळणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. विशेष म्हणजे वेषांतरानंतर त्यांना कोणीही ओळखू शकले नाही. या कारवाईमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.