- किरण शिंदे
Vishal Agarwal Arrested, Pune Porsche car accident | पुणे : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथक त्यांच्या मागावर होते. अखेर मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेत अटक केली.
विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत बेदरकारपणे कार चालवत दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये दुचाकी वरील अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील कल्याणी नगर परिसरात ही घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अल्पवयीन असलेल्या कारचालकाला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र कारचालक अल्पवयीन असल्यामुळे कोर्टाने त्याला लगेच जामीनही दिला होता. त्यानंतर पुणे पोलिसांवर चहुबाजूनी टीका होत होती.
यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या हातात परवाना नसतानाही कार दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाले होता. पुणे पोलिसांची दहा ते बारा त्याच्या मागावर होती. पुणे, रत्नागिरी, दौंड, रसायनी, शिरूर या शहरात विशाल अग्रवालचा शोध घेतला जात होता, मात्र तो सापडत नव्हता. अखेरीस तो संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडीतूनच त्याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. आज दुपारनंतर विशाल अग्रवालला पुण्यात आणले जाईल आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले जाईल.