लातूर : व्यापारानिमित्त लातुरात आलेल्या पुण्याच्या एका व्यापाऱ्याला साेन्याच्या दागिन्यासह राेख रकमेची बॅग हिसकावत पळविल्याची घटना घडली हाेती. याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका अल्पवयीन मुलासह अन्य एका आराेपीला पाेलीस पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दुचाकीसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ त्यास लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २३ नाेव्हेंबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, पुणे येथील व्यापारी रिंकेश चंपालालजी साेनी (३२ रा. काेंढवा, पुणे) हे व्यापारानिमित्त लातुरात १९ नाेव्हेंबर राेजी आले हाेते. व्यवहारातील काही रक्कम, साेन्याचे दागिने आणि राेख रक्कम २५ हजार बॅगमध्ये ठेवत मुक्कामासाठी लाॅजकडे पायी निघाले. दरम्यान, रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास कामदार राेड येथे फिर्यादीच्या पाठीवर असलेली दागिन्यांची, राेख रकमेची बॅग अनाेळखी व्यक्तींनी त्यांच्याजवळील रिव्हाल्वरचा धाक दाखवत झटापट सुरू केली. काही वेळी व्यापारी आणि दाेघा आराेपीमध्ये ही झटापट सुरूच हाेती. शेवटी हिसका मारून दाेघा अज्ञातांनी बॅग पळविली. याबाबत रात्री उशिरा गांधी चाैक पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण गंभीर असल्याने घटनास्थळी जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पाेलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पाेलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी भेट देऊन पाहणी केली. आराेपींच्या शाेधासाठी तातडीने विशेष पथकाला सूचना केल्या. पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे २० नाेव्हेंबर राेजी रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे (२० रा. औसा राेड, लातूर) याच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अधिक चाैकशी केली असता, दाेघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून एक माेटारसायकल, साेन्याचे दागिने आणि राेख रक्कम असा ५ लाख ४८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, २३ नाेव्हेंबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावण्यात आली आहे. विशेष पथकातील वहीद शेख, रामचंद्र ढगे, महेश पारडे, अभिमन्यू साेनटक्के, रवी गाेंदकर, खुर्रम काझी, यशपाल कांबळे, मुळे, शिंदे यांनी ही कारवाई केली.