पुणे (Pune Crime News) शहरात पोलिसांनी सेनेचा अधिकारी बनून अनेक महिलांसोबत लग्न करण्याच्या आरोपात औंरंगाबादच्या कन्नडमध्ये राहणाऱ्या योगेश दत्तू गायकवाडला अटक केली आहे. त्यासोबतच २६ वर्षीय योगेशवर सेनेत नोकरी देण्याच्या नावावर २० पेक्षा जास्त तरूणांना फसवण्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याचा मित्र संजय शिंदे यालाही अटक केली आणि दोघांकडूनही सेनेचे १२ ड्रेसेससोबतच इतरही काही आक्षेपार्ह वस्तू ताब्यात घेतल्या.
महिलेने दिली होती तक्रार
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं की, 'योगेशने सेनेचा अधिकारी बनून अनेक महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना फसवलं आहे. गेल्या महिन्यात १२ तारखेला पुण्याच्या बिबवेवाडीमध्ये राहणारी २२ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी योगेश गायकवाडला अटक केली.
कशी झाली होती महिलेसोबत भेट?
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, तक्रारदार महिलेने सांगितलं की, 'गेल्यावर्षी जानेवारीमध्ये माझ्या आईची तब्येत बिघडली होती आणि तिच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका हॉस्पिटलमध्ये आम्ही नेहमीच जात होतो. एकदा मी आणि माझी आई बस स्टॉपवर बसची वाट बघत होतो तेव्हा योगेश सेनेच्या वर्दीत आला होता. त्यावेळी त्याचं आयडी कार्ड रस्त्यावर पडलं होतं. जे मी त्याला उचलून दिलं होतं. यादरम्यान आमचं बोलणं झालं आणि ओळख झाली.
महिलेसोबत परिवारालाही लावला चूना
महिलेने सांगितलं की, 'बस स्टॉपवर भेट झाल्यावर काही दिवसांनी योगेशने मला फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली आणि आमचं बोलणं सुरू झालं होतं. एक दिवस त्याने मला लग्नासाठी प्रपोज केलं आणि नंतर आम्ही आळंदीमध्ये लग्न केलं. पण त्याने मला कधीच त्याच्या घरी नेलं नाही. त्याने माझ्या भावाला सेनेत नोकरी लावून देतो सांगत दोन लाख रूपये घेतले होते. अशाप्रकारे त्याने माझ्या भावाच्या १० ते १५ मित्रांकडूनही पैसे घेतले होते'.
५३ महिलांशी अफेअर, ४ लग्ने
वरिष्ठ निरीक्षक सुनील जावरे म्हणाले की, 'चौकशीतून योगेश गायकवाडने चार लग्ने केल्याचं समोर आलं आहे. यातील दोन लग्ने त्याने पुणे शहरात, एक अमरावती आणि एक औरंगाबादमध्ये केलं. योगेशने दोन लग्ने आंळदीच्या धर्मशाळेत आणि दोन इतर मंदिरात केली होती. पण कोणतंही लग्न रजिस्टर्ड केलं नव्हतं'. ते म्हणाले की, 'आमच्या सुरूवातीच्या तपासातून समोर आलं की, 'योगेश ५३ महिलांना डेट करत होता'.
कर्नल किंवा मेजर असल्याचं सांगत होता
एसपी सुनील जावरे म्हणाले की, 'योगेश जेव्हाही महिलांना भेटत होता तेव्हा तो सेनेच्या कपड्यांमधध्ये राहत होता. स्वत:ला कर्नल राम किंवा मेजर राम सांगत होता. यासोबतच असाही दावा करत होता की, तो जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहे. त्याच्याकडे सेनेच्या १२ वर्दी, २६ नवे शूज, दोन बाइक, दोन कार, एक ट्रंक, सेल फोन, रबर स्टॅम्ह आणि इतर काही वस्तूंसोबत ५.५ लाख रूपये सापडले आहेत. पोलिसांना त्याचा २०१७ पासून शोध होता'.