उदगीर (जि. लातूर) : शहरातील एका व्यापाऱ्याच्या दुकानावर पुणे जिल्ह्यातील वाकड ठाण्याच्या पाेलीस पथकाने छापा मारला. दरम्यान, यावेळी पथकाने ७ लाख ९७ हजार ३२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत संबंधित पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहर पाेलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वाकड येथील पाेलिसांनी ७ सप्टेंबरराेजी राहटणी (जि. पुणे) येथे मल्लिकार्जुन बसवंत पाटील (२४) याच्याकडून प्रतिबंधित असलेला विविध प्रकारचा पानमसाला आणि तंबाखू असा १ लाख ३३ हजार ६४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, वाकड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चाैकशीत हा पानमसाला, तंबाखू सईद खुर्शिद अहमद साबेरी (रा. खतीब कॉलनी शेल्हाळ रोड, उदगीर) याच्याकडून खरेदी केल्याचे समाेर आले. याबाबत अटकेतील मल्लिकार्जुन पाटी याने माहिती दिली. दरम्यान, साबेरी याला १२ सप्टेंबरराेजी वाकड पाेलिसांनी अटक केली हाेती. उदगीर शहरात त्याचे दुकान असल्याची माहिती वाकड पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी उदगिरात दाखल हाेत दुकानावर छापा मारून झाडाझडती घेतली. यावेळी ३ लाख ४२ हजार १२१ रुपये आणि ४ लाख ५५ हजार २०० रुपये तसेच राेख रक्कम असा ७ लाख ९७ हजार ३२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय, माल खरेदी-विक्रीच्या नोंदी असलेल्या वह्या, रजिस्टरही वाकड पोलिसांनी जप्त केले आहे, अशी माहिती तपास अधिकारी पाेलीस उपनिरीक्षक एम. के. मणेर यांनी दिली. ही कारवाई पुणे येथील हवालदार ए. ए. काळे, डी. पी. साबळे, ए. ए. शेख, उदगीर पाेलीस ठाण्याचे गजानन पुल्लेवाड यांच्या पथकाने केली.