पुणेपोलिसांच्या दादागिरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत नाहीय तोच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. रस्त्यात टेम्पो लावल्याच्या कारणावरून महिला पोलीस कर्मचारी एका हमालाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचा हा व्हिडीओ आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पुण्याच्या वादग्रस्त पोलिस अधिकाऱ्याची पुन्हा दादागिरी; नागरिकांना बंद खोलीत मारहाण, Video व्हायरल
लोणी काळभोर परिसरातल्या उरुळी कांचन इथल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने या हमालाला हात मोडून टाकण्याची धमकी दिली आहे. किशोर निवृत्ती गरड असं मारहाण करण्यात आलेल्या हमालाचं नाव आहे. तर त्याला मारहाण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव भारती होले असे आहे. उरुळी कांचन इथल्या पोलीस चौकीत त्या कार्यरत आहेत.
शिंदवणे गावाच्या रस्त्यावर एक किराणा मालाचं दुकान आहे, त्या दुकानात गरड हे टेम्पोतील माल उतरवित होते. तेव्हा तिथे आलेल्या पोलीस भारती होले यांनी हमालाला रस्त्यात टेम्पो उभा केला म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
गरड यांनी माफी मागितली. तरी देखील होले यांनी मारहाण सुरूच ठेवली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर धायगुडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन उपस्थितांना देण्यात आले. या घटनेमुळे पोलिसांची अरेरावी पुन्हा एकदा समोर आली आहे. त्या संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.