पुणे शहरातील एका नशामुक्ती केंद्रात दोन मुली एकमेकींना किस करत होत्या. यावर तेथील केअर टेकरने त्यांना हटकलं. त्यामुळे दोन्ही तरूणींनी रागात येऊन महिलेला बेदम मारहाण केली. या महिलेचं वय ६४ आहे. या घटनेत केअर टेकर महिलेचे दात पडले आहेत.
याप्रकरणी ६४ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. पुण्याच्या सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये चार मुलींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली आहे. तक्रारदार महिलेने आधी आपल्या दातांवर उपचार केले त्यानंतर तक्रार दिली. उपचार सुरू असल्याने महिलेला तक्रार करण्यास उशीर झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाण झालेली महिला पुण्याच्या सिंहगड रोडवरील नशा मुक्ती केंद्रात केअर टेकर म्हणून काम करते. फेब्रुवारी महिन्यात एक दिवस नशा मुक्ती केंद्रात दोन तरूणी एकमेकींना किस करत होत्या. अचानक तिथे केअर टेकर महिला पोहोचली. केअर टेकरने दोन्ही तरूणींना यावरून हटकलं. किस करण्यास मनाई केली. नंतर महिलेने तरूणींची तक्रार व्यवस्थापकांकडे केली.
केअर टेकर महिलेच्या तक्रारीमुळे दोन्ही तरूणी चिडल्या. नंतर दोन्ही तरूणींनी इतर तरूणींना बोलवलं आणि महिलेला सर्वांनी मिळून मारहाण केली. यात महिलेचा दात तुटले. तक्रारदार महिला उपचारासाठी मुंबईला गेली होती. उपचारानंतर महिला पुण्यात परत आली आणि नंतर तिने तक्रार केली.