पुण्यातील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याने दादागिरी करत नागरिकांना बंद खोलीत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या अधिकाऱ्याने महिनाभरापूर्वीही वॉटरबारमध्ये महिला आणि मुलींना मारहाण करत धुमाकूळ घातला होता.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पो नि राजेश पुराणिक यांनी ही मारहाण केली आहे. पुराणिक यांच्याविरोधात अनेक लोकांनी अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत. यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी अद्याप कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
वादग्रस्त असलेले राजेश पुराणिक सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत आहेत. वेळोवेळी तक्रार करूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी पाठीशी घालत आहेत. पुराणिक यांनी एक महिन्यापूर्वी वॉटरबारमध्ये जेवणासाठी आलेल्या महिला आणि मुलींना मारहाण केली होती. त्यानंतर पुराणिक यांचा आणखी एक व्हिडीओ येत आहे. पुराणिक यांनी कोणाला मारहाण केली? कुठे आणि कशासाठी केलीय हे अद्याप समोर आलेले नाही. व्हायरल व्हिडीओतून हा प्रकार समोर आलेला आहे.