जम्मू-काश्मीर पोलीस आणि पंजाब पोलिसांनी लुधियानाच्या मुल्लानपूर दाखा येथे आंतरराज्य ड्रग्ज नेटवर्कच्या विरोधात संयुक्त कारवाई केली. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी लुधियानातील मुल्लानपूर दाखा येथे छापा टाकला. पोलिसांनी येथून ४.९४ कोटी रुपयांचे ड्रग्ज, रोख रक्कम आणि ३८ वाहनांच्या बनावट नंबरप्लेट जप्त केल्या आहेत. तसेच, पोलिसांनी आरोपींकडून एस-४०० रिव्हॉल्व्हरही जप्त केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलीस आणि काउंटर इंटेलिजन्स टीमने लुधियानाच्या मुल्लानपूर दाखा येथील मोहल्ला दशमेश नगरमध्ये एआयजी सिमरत पाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली एका घरावर छापा टाकला. याठिकाणी लाखो रुपयांची रोकड जमा झाल्याचा पोलिसांना संशय होता. यावेळी एसएसपी नवनीत सिंग बैंस, डीएसपी राखा अमनदीप सिंग आणि लुधियाना ग्रामीण पोलीस जिल्ह्याचे काउंटर इंटेलिजन्सचे पथकही घटनास्थळी पोहोचले होते.
काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या रामगन पोलीस ठाण्यात ३० किलो कोकेन जप्त करण्यात आल्याचेही सूत्रांकडून समोर आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी लुधियाना काउंटर इंटेलिजन्स टीमसोबत संयुक्त कारवाई करत गोदामावर छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला अटक केली असून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून नोटा मोजण्याचे मशीन आणि बनावट ओळखपत्रही जप्त केले आहेत.
यासंदर्भात पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ते म्हणाले, आंतरराज्य ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त कारवाईत मुल्लानपूर दाखा येथून एका ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. पोलिसांनी ड्रग्ज तस्कराकडून ४.९४ कोटी रुपये रोख आणि ३८ बनावट वाहनांच्या नंबर प्लेट जप्त केल्या आहेत. तसेच, आरोपींकडून जिवंत काडतुसे भरलेले रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले आहे, असे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले.