Punjab Crime News: पंजाबच्या जालंधरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. पत्नी घरी येत नसल्यामुळे नाराज पतीने सासरी जाऊन पत्नी, मुलगा, मुलगी, सासरे आणि सासूला जिवंत जाळले. मेहतपूर शहरात ही घटना घडली असून, कुलदीप सिंग, असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत पत्नी परमजीत कौर, मुलगा गुरमोहल, मुलगी अर्शदीप कौर, सासू जंगीद्रो आणि सासरे सुरजन सिंग यांचा होरपळून मृत्यू झाला.
एसपी सरबजीत सिंग बहिया यांनी सांगितले की, आरोपी कुलदीप सिंगने त्याच्या साथीदारांसह सासरी जाऊन सर्वांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले आणि घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. कुलदीप आणि परमजीतचे दुसरे लग्न झाले होते आणि परमजीत त्याच्यासोबत राहत नव्हती. पत्नी घरी येत नसल्यामुळे आरोपी कुलदीप नाराज होता.
काय आहे संपूर्ण प्रकरणसुरजन सिंगने 8 वर्षांपूर्वी मुलगी परमजीत कौरचे लग्न लावले होते, पण काही काळापूर्वीच पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर परमजीत कौर आपल्या दोन मुलांसह माहेरी आल्या. सुमारे वर्षभरापूर्वी परमजीत यांचे दुसरे लग्न खुरासैदपूर गावातील कुलदीप सिंग उर्फ कल्लू नावाच्या व्यक्तीशी लावले. पण, कल्लूने पत्नी आणि मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर परमजीत आपल्या माहेरी निघून आल्या.
आरोपी फरारघटनेच्या दिवशी म्हणजेच काल रात्री कुलदीप दारू पिऊन सासरी आला. तेव्हा परमजीतचे संपूर्ण कुटुंब झोपले होते. यावेळी कुलदीपने पेट्रोल शिंपडून घराला आग लावली. यात सासरा सुरजन सिंग, सासू जांगीद्रो, पत्नी परमजीत, मुलगा गुरमोहल आणि मुलगी अर्शदीप यांचा होरपळून मृत्यू झाला. सध्या पोलीस कुलदीप सिंगचा शोध घेत आहेत.