पंजाबच्या जालंधरमध्ये तैनात असलेले डीएसपी दलबीर सिंग यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या झाल्याने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. दलबीर सिंग यांचा मृतदेह सोमवारी बस्ती बावा खेल येथील एका रस्त्याच्या कडेला आढळला आहे. स्थानिक लोकांसोबत डीएसपींचा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दलबीर यांची जालंधरच्या एका गावातील लोकांशी वादवादी झाली होती. तेथील लोकांनी लायसनच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबारही केला होता. दुसऱ्या दिवशी या गाववाल्यांसोबतचा वादही मिटविण्यात आला होता. यामुळे पोलिसांसमोर दलबीर यांची हत्या का झाली असा सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांना अज्ञाताने फोन करून मृतदेह रस्त्याकडेला पडलेला असल्याचे कळविले होते. पोलिसांनी मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांना तो डीएसपी दलबीर सिंग यांचा असल्याचे समजले. त्यांच्या डोक्यावर जखम होती. सुरुवातीला पोलिसांना रस्ते अपघात असल्याचे वाटले. परंतु, त्यांच्या मानेत बंदुकीची गोळी असल्याचे पोस्टमार्टेममध्ये समोर आले आहे. तसेच डीएसपींची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर देखील गायब आहे. यामुळे हत्येचा संशय बळावल्याचे एडीसीपी बलविंदर सिंग रंधावा यांनी सांगितले.
या प्रकरणी डीएसपींच्या मित्रांची चौकशी करण्यात आली आहे. नववर्षाच्या रात्री डीएसपीना त्यांनी बस स्टँडच्या मागे सोडल्याचे सांगितले. यावेळी त्यांचे गार्ड सोबत नव्हते. यामुळे पोलीस बस स्टँडच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे. दलबीर सिंग हे प्रसिद्ध वेटलिफ्टर होते आणि त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.