लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या परिसरात कुख्यात गुन्हेगार अखिलेश ऊर्फ पप्पू मिश्राने कचरा संकलित करणाऱ्या ठेकेदाराला धमकी देऊन दोन लाखाचा हप्ता मागितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पप्पूला अटक केली आहे.पप्पू बऱ्याच दिवसापासून गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे. त्याच्या विरुद्ध ३० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए नुसारही कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसापासून तो सामाजिक संघटनेच्या माध्यमातून नेतागिरी करीत आहे. पोलिसांनी कोणताच गुन्हा दाखल न केल्यामुळे त्याच्या हालचालीत वाढ झाली होती. फुटाळा येथील रहिवासी सचिन चव्हाण महापालिकेच्यावतीने कचरा संकलित करणाऱ्या बीव्हीजी कंपनीचे काम सांभाळतात. सचिनचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्या नेतृत्वात वेगवेगळ्या झोनमध्ये कचरा संकलन करण्यात येते. सचिनच्या तक्रारीनुसार पप्पू ६ जानेवारीपासून त्याला हप्ता वसुलीसाठी त्रास देत आहे. त्याने आपल्यासाठी १ लाख आणि संस्थेच्या नावाने १ लाख देण्यास सांगितले. पैसे न दिल्यास कचरा संकलनाचे वाहन चालू देणार नसल्याची धमकी दिली. सचिनने सुरुवातीला त्याच्या धमकीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पप्पूने त्यास फोनवरून प्रतापनगर परिसरात धमकी दिली. ६ जानेवारीपर्यंत हे प्रकरण सुरू होते. ३० जानेवारीला सचिन सदरच्या श्रीराम टॉवरमध्ये होता. तेथे पप्पूने त्यास पकडले. हप्ता मागून मारहाण केली. सचिनने सदर पोलिसांना सूचना दिली. सदर पोलिसांना चौकशीत हप्ता वसुलीची सुरुवात गिट्टीखदानमधून झाल्याची माहिती समजली. त्या आधारावर हप्ता वसुलीचा गुन्हा दाखल करून पप्पूला अटक करण्यात आली. पप्पूच्या अटकेमुळे गिट्टीखदान ठाण्याच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला मागितला दोन लाखाचा हप्ता : पप्पु मिश्राला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 8:52 PM
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या परिसरात कुख्यात गुन्हेगार अखिलेश ऊर्फ पप्पू मिश्राने कचरा संकलित करणाऱ्या ठेकेदाराला धमकी देऊन दोन लाखाचा हप्ता मागितला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पप्पूला अटक केली आहे.
ठळक मुद्देनागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल