लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : व्यवसायाच्या नावाखाली उधारीवर ८२ लाखांचे ड्रायफ्रूट घेऊन त्याचे पैसे न देता व्यापाऱ्याची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याने दिलेल्या पत्त्यावर ती व्यक्ती राहतच नसल्याचे समोर आले आहे.
एपीएमसीमधील व्यापारी अमृत ढवळे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांची अनिल राजगुरुकर नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली होती. अनिलने ढवळे यांच्या कंपनीतून सुरुवातीला १५ लाखांचे ड्रायफ्रूट उधारीवर घेतला होते. त्याची रक्कम टप्प्याटप्प्यात दिल्याने ढवळे यांचा त्याच्यावर विश्वास बसला. याच ओळखीचा फायदा घेत, अनिल याने ढवळेंकडून जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत ८२ लाख १० हजारांचे ड्रायफ्रूट उधारीवर घेतले. त्याच्या बिलाची रक्कम देतो, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अनिलने संपर्क तोडला असता, ढवळे यांनी त्याच्या कोपरखैरणेतील पत्त्यावर जाऊन चौकशी केली. यावेळी त्या ठिकाणी तो राहतच नसल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.