यवतमाळ - जिल्ह्याच्या पुसद येथील शेंबाळपिंपरी रोडवरील दिगांबर गुंजकर यांच्या जागेवरील दुकानात धाड घालून पुरवठा विभागाने सिलिंडरचा साठा पकडला. यात ३० रिकामे सिलिंडर जप्त करण्यात आली.शेंबाळपिंपरी रोडवरील दिगांबर गुंजकर यांच्या जागेवर लावलेल्या एका दुकानातून अनधिकृतपणे सिलिंडर वितरीत केले जात असल्याची माहिती अन्न व पुरवठा विभागाला प्राप्त झाली. त्यावरून शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पुरवठा विभागाने या दुकानावर धाड घातली. पुरवठा अधिकाºयांनी त्यांच्याकडे वितरणाची कागदपत्रे मागितली. मात्र कागदपत्रे उपलब्ध झाली नाही. सदर सिलिंडर पुरवठा श्रीरामपूर येथील गुंजकर एचपी गॅस एजंसीमार्फत केला जात असल्याचे आढळले. मात्र वितरणाचे ठिकाण अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणावरून सिलिंडर वितरणासाठी अधिकृतपणे संबंधित गॅस कंपनी अथवा तहसीलकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पुरवठा विभागाने ३० रिकामे सिलिंडर जप्त केले. ही कारवाई ३.३० वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी दिलीप सरगर व गजानन पंडितकर पंच म्हणून उपस्थित होते. ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथील निरीक्षण अधिकारी व त्यांच्या चमूने पार पाडली.
पुसदमध्ये सिलिंडरचा साठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 8:06 PM