नाशिक : जिल्ह्यातील गुजरात सीमावर्ती भागाला लागून असलेल्या जंगलांमध्ये पुन्हा ‘पुष्पा’ टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. या टोळ्या जंगलातील खैरांवर सर्रासपणे कटर फिरवत असल्याने वनविभागही सतर्क झाला आहे. नाशिक वनविभागाने या पार्श्वभूमीवर ठोस पावले उचलली असून रात्रीची गस्त वाढविली आहे. या दोन दिवसांत बाऱ्हे वनपरिक्षेत्राच्या सीमावर्ती भागात खैराची तस्करी राेखण्यास पथकाला मोठे यश आले आहे. दोन संशयित चोरटेही वनपथकाच्या हाती लागले आहे.
बाऱ्हे वनपरिक्षेत्रातील ठाणगाव, उंबरने खिर्डी या आदिवासी गावांमधून खैराची लाकडे वाहून नेली जाणार असल्याची गोपनीय माहिती बारे वनपथकाला मिळाली. वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कंवर यांनी त्वरित उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार यांना माहिती कळविली. त्यांनी पथक सज्ज करत सापळा रचण्याचे आदेश दिले. यानुसार वनपाल प्रवीण गांगुर्डे, हिरामण महाले, माया म्हस्के, तुषार भामरे, वनरक्षक तुषार भोये, भास्कर पवार, हेमराज गावित, एकनाथ गवळी, पुनाजी वालदे, वसंत गावित, लक्ष्मण घटका, सुशीला लोहार, नम्रता थैल, बेमी महाले अशी दोन पथके रवाना करण्यात आली. या पथकांनी बुधवारी (दि.१३) मध्यरात्री रात्री सापळा रचला.
संशयास्पद बोलेरो जीपचा पाठलाग करताना अंधारात जीप जंगलाच्या एका आडवळणाच्या रस्त्यावर सोडून संशयित चालक पसार झाले. पथकाने बोलेरो पिकअप जीप (एम.एच४२ एम७३३) जप्त केली आहे. या जीपमधून अंदाजे पाच हजार रूपये किंमतीचे खैराचे ३७ नग हस्तगत करण्यात आले. तसेच जीपला मार्ग दाखविणारा दुचाकीस्वार व जीपचा मालक संशयित योगेश सुदाम झांजर (२७,रा.सातपाडा, ता.सुरगाणा) व त्याच्या पाठीमागे दुचाकीवर असलेला साथीदार संशयित चंदर काकरडे (४०,रा.खोगळा, ता.सुरगाणा) यांना पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची दुचाकी (जी.जे११ डी.जी८८४३) जप्त केली. त्याच्याविरुद्ध वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास दिंडोरी तालुका न्यायलयात गुरुवारी (दि.१४) हजर करण्यात आले. न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडी दिली.
खैर नेणारी क्वालिस कार जप्तखैराच्या जंगलावर गुजरात तस्कर टोळ्यांची कायमच वक्रदृष्टी राहिली आहे. शुक्रवारनंतर पावसाने उघडीप देताच चोरट्यांनी जंगलात कापून ठेवलेल्या खैराचा मालाची वाहतूक सुरू केली होती; मात्र वनपथकाच्या सतर्कतेने त्यांचे डाव हाणून पाडले गेले. बुधवारी पहाटे बाऱ्हे वन पथकाने क्वालिस मोटारदेखील (जी.जे१५ बीबी ३१०) पथकाने रोखली. क्वालीसमधून खैराच्या लाकडांचे २४ नग हस्तगत करण्यात आले.
हरसूलमध्ये खैराचा आयशर रोखलाहरसूल वनपरिक्षेत्राच्या हद्दीत सीमावर्ती भागात खैराची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती वनपथकाला मिळाली. यानुसार गुजरात सीमेजवळीली रायता गावाच्या शिवारात वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार, वनपाल अमित साळवे, महादू मौळे, पद्माकर नाईक, सुनील टोंगारे, वनरक्षक मनोहर भोये, मंगेश गवळी, रामदास गवळी, वाहनचालक संजय भगरे यांच्या पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून रोखला. खैराचे ओंडके भरून घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोमध्ये (एम.एच२० ईजी७३८०) ९४ नग (१.९०० घनमीटर) इतका साठा आढळून आला आहे.