साखरखेर्डा: मेहकर मार्गावरील महालक्ष्मी तलावानजीक असलेल्या ई-क्लासच्या जागेवरून चौघा भावंडामध्ये वाद होऊन १९ एप्रिल रोजी तुंबळ हाणामारी होऊन तिघे जण गंभीर जखमी झाले होते. दरम्यान यातील एकाचा रुग्णालयात उपाचारदरम्यान ८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी याप्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव एकनाथ सिताराम टाले (३०) असे आहे. साखरखेर्डा येथील सिताराम टाले यांना सात मुले आहे.
३५ वर्षापूर्वी सिताराम टाले यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रामदास, भानुदास, देविदास, हरिभाऊ, पांडुरंग, अंबादास, एकनाथ या सातही मुलांचा त्यांच्या आईने मोलमजुरी करून सांभाळ केला होता. दरम्यान रामदास, भानुदास, अंबादास आणि देविदास हे मोलमजुरी करून शेती व्यवसायाकडे वळले होते. तर लहान भावंडांनी महालक्ष्मी तलावाच्या काठावरील ई-क्लास जमिनीवर धाबा टाकून व्यवसाय सुरू केला होता. तिघांचेही विवाह झाले होते. दरम्यान या व्यवसायावर देविदास टाले यांची नजर होती.
धाब्याची जागा आपल्यालाच हवी अशी मागणी करत त्यांनी तिघाही लहान भावंडांना धमक्या देण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे तिघांनीही जागा तुम्हाला देतो वाद करू नका असे सांगितले होते. परंतू १९ एप्रिल रोजी देविदास टाले यांनी त्यांच्या दोन मुलांना सोबत घेऊन तिघाही लहान भावंडासोबत वाद केला. बेसावध असलेल्या हरिभाऊ, पांडुरंग आणि एकनाथ यांना त्यांनी जबर माहाण केली. तिघांनाही बेशुद्धावस्थेत चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान यातील एकनाथ टाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणात ७ मे रोजीच साखरखेर्डा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह गंभीर माराहण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेले असतांनाच ही घटना घडली. ३० एप्रिल रोजी या प्रकरणात पांडुरंग टाले यांनी तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी देविदास सिताराम टाले, पवन देविदास टाले, श्रीकृष्ण देविदास टाले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान एकनाथ टाले यांचा ८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ठाणेदार स्वपनील नाईक यांनी सांगितले. प्रकरणातील मुख्य आरोपी देविदास सिताराम टाले, पवन देविदास टाले, श्रीकृष्ण देविदास टाले यांना साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे.