पिंपरी : रस्त्यात उभे केलेले वाहन पुढे घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका तरुणाने महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केली. तसेच आमदाराला फोन लावतो, मी कोण आहे ते दाखवतोच असे म्हणत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी सागर निवृत्ती शितोळे (वय ३२, रा. काकडे कॉलनी, आदर्शनगर, हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलीस हवालदारने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि. २) रात्री साडेआठच्या सुमारास हिंजवडी-वाकड रस्त्यावरील इंडियन आॅईलच्या पेट्रोल पंपाजवळ ठिकाणी शितोळे याने त्याची मोटार मध्येच थांबविली. त्या वेळी तेथे ड्युटीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला हवालदाराने शितोळे यास मोटार पुढे किंवा मागे घेण्यास सांगितले. त्यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. शितोळे याने मी आमदाराला फोन लावतो, मी कोण आहे ते तुला दाखवितो असे म्हणत शिवीगाळ केली आणि महिला पोलीस हवालदाराशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
हिंजवडीत महिला पोलिसाला शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 4:41 PM